फूटपाथ+ सिग्नलवरील व्यवसाय + शिक्षण = दहावीतील यश ; सिग्नल शाळेचा दहावीचा निकाल 100%
सिग्नल शाळेचा दहावीचा निकाल 100%,मोहन 76 टक्के तर दशरथ 64 टक्क्यांनी उत्तीर्ण होत दोघांनी अनोखे यश मिळवत ठेवला नवा आदर्श समर्थ भारत व्यासपीठ आणि सिग्नल शाळा परिवाराचा जल्लोष
शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या भिक्षेकर, स्थलांतरीत कुटुंबातील मुलांनी अतिशय खडतर परिस्थितीत महाराष्ट्र शासन, माध्यमिक व उच्च माध्यमिक दहावीच्या शालांत परिक्षेत उत्तीर्ण होत शिक्षणाच्या परीघापासून दूर असलेल्या लाखो मुलांसमोर आदर्श ठेवला आहे. जिद्द, आत्मविश्वास, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांना ही यशाची चव चाखता आली आहे.
१९ वर्षाचा मोहन प्रभू काळे तर १६ वर्षीय दशरथ युवराज पवार. फूटपाथ+ सिग्नलवरील व्यवसाय + शिक्षण = दहावीतील यश. असे समीकरण साधत त्यांनी आपल्या आयुष्याला नवीन दिशा देण्याचे ठरवले आहे. हा प्रवास तसा सोप्पा नव्हताच. सिग्नल शाळेतील दोघांचाही प्रवेश त्यांच्या प्रामाणिक हेतूवर शंका घेऊन सुरुवात झालेला. शिक्षणाविषयीची त्यांची प्रबळ इच्छेची खात्री होताच आरती परब यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनीही कंबर कसली. पण अडचणींचे डोंगर हनुमानाच्या शेपटाप्रमाणे शेवटपर्यंत लांबत होते. कारण केवळ ५-६ वीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर ८-९ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा त्यांनी पुस्तक हातात घेतले होते. त्यात या मुलांना लगेचच दहावीला बसविणे अशक्यप्राय वाटत होते. पण तरीही त्यांचे रस्त्यावरचे जीवनमान, त्यांची वाढती वयं, कमावती मुलं म्हणून असलेला कुटुंबाचा आधार या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांनी पुढील आयुष्य सुकर होण्यासाठी निदान दहावी करावी असा धाडसी निर्णय सिग्नल शाळेच्या चमूने घेतला. त्यामुळे सर्वच शिक्षकांसमोर मोठे आव्हान होते. मुळात, १९ वर्षीय मोहनला पुन्हा शाळेत पटावर कसे बसवायचे हा प्रश्नच भेडसावत असतानाच ठा.म.पा. शाळा क्र. १९ च्या मुख्याध्यापिका सौ. लोहकरें बाईंनी हा प्रश्न सोडवला. १७ क्रमाकांचा अर्ज न भरता मुख्य प्रवाहात सर्व मुलांना दाखल करण्याच्या सिग्नल शाळेच्या उद्दिष्टास शाळेत प्रवेश देऊन पूर्णत्वास नेले.
सुरुवातीला, या मुलांची प्रगती पाहता आमचा निर्णय चुकतोय की काय असे वाटले होते. कारण पहिल्या चाचणी परीक्षेत अवघ्या काही गुणांनी मुले पास झाली होती. परंतु दृढ इच्छेच्या जोरावर व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी ते खोटे ठरवले. इंग्रजी, विज्ञान व गणित हे तिन्ही विषय पक्के करुन घेणे खूप गरजेचे होते. इंग्रजी विषयाची जबाबदारी सौ. सुप्ती मुखर्जी, सौ. सुप्रिया कर्णिक, सौ. अश्विनी औंधे या तिघींनी घेतली होती. तर ज्ञानसाधना विद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. चारुलता देशमुख व कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या सौ. संचिता धनावडे यांनी विज्ञान विषयाची धुरा सांभाळली होती. ठाण्यातील नामांकीत सिंघानिया शाळेच्या सौ. पौर्णिमा करंदीकर व बदलापूर येथील, आदर्श विद्यामंदिरच्या शिक्षिका सौ. ज्योती जावळे शाळेच्या अनुक्रमे बीजगणित व भूमिती विषय शिकवत होत्या. समाजशास्त्र विषयाची जबाबदारी सौ. स्वरुपा बोजेवार यांनी घेतली होती. तर इतर विषयांची जबाबदारी सौ. सुमन शेवाळे, सौ. श्रद्धा दंडवते व दुर्गा खुरकुटे यांनी घेतली होती. अतिशय विचारपूर्वक व सुनियोजित आखणीने या सर्वं शिक्षकांनी मोहन, दशरथवर कठोर मेहनत घेतली आहे. फूटपाथवर बसून अभ्यास करण्यास बरेच अडथळे येत आहेत हे लक्षात आल्यावर वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात सौ. सुमन शेवाळे यांनी आपल्या घरीच रात्रंदिवस मुलांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली.
शिक्षकांच्या मेहनतीसोबतच त्यांची स्वत:ची मनाची तयारी असणे गरजेचे होते. कारण मोहनचे वडील अपंग असून ते सिग्नलवर भीख मागत फिरतात तर दशरथचे वडील काही कारणास्तव गावी तुरुंगात आहेत. कुटुंबातील कर्ते पुरुषच कुटुंबात असून नसल्यासारखी परिस्थिती होती. मुलगा म्हणून त्यांच्यावर कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीचा ताण होताच. परंतु दारिद्र्याने पिचलेल्या रस्त्यावरील आयुष्याला राम राम ठोकण्यासाठी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत हे शिवधनुष्य पेलले. ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरु झालेली तीन हाथ नाक्यावरील सिग्लन शाळा सदैव अशा मुलांसोबत उभी राहणार आहे.