प्लास्टीक व थर्माकोलला पर्याय….ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोन दिवसात आठ हजार लोकांनी दिली प्रदर्शनाला भेट

ठाणे- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे गावदेवी मैदानात आयोजित केलेल्या प्लास्टीक व थर्माकोलला पर्याय प्रदर्शनाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन दिवसात आठ हजार लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. ५ जूनपर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी १० वेळेत सुरू राहणार आहे.

प्लास्टीक व थर्माकोलवर लवकरच कायमस्वरूपी बंदी येणार आहे. त्यामुळे  या दोन्ही गोष्टीना पर्याय काय असू शकेल याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे. ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात प्लास्टीक व थर्माकोलला पर्यायचे अनेक उत्पादने जनतेच्या माहितीसाठी व विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कागद, उसाची चिपाड, सुपारी आदीपासून बनवलेल्या प्लेटस, वाट्या, चमचे तसेच मातीत रूपांतरीत होत असलेल्या डस्ट्बीन बॅग, सामानासाठी वापरता येतील अशा पर्यावरणस्नेही बॅगा, प्लास्टीक व थर्माकोलपासून प्रक्रिया करून काढलेले इंधन देखील प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. याशिवाय आदिवासी मुलीनी वारली पेंटीगमध्ये रंगवलेल्या कापडी बॅगा, जुने कपडे, साड्या आदी वापरून केलेल्या पिशव्या, मोबाईल पाऊच, भाजीसाठी सात-आठ कप्पे असलेली एकच पिशवी याना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

ठाणेकर नागरिकांबरोबर छोटे मोठे उद्योजक देखील प्रदर्शनाल भेट देऊन उत्पादनांची माहिती घेत आहेत. प्रदर्शनात ठाणे महापालिकेने नागरिकांसाठी मोफत रोपे घेऊन जाण्याची देखील सोय उपलब्ध करून दिली आहे, तसेच पक्ष्यांसाठी नारळापासून, बांबूपासून तसेच मातीपासून केलेली घरटी देखील मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

प्रदर्शनात रोज सायंकाळी ५ ते ७ वेळेत विविध कार्यशाळेचे तसेच पर्यावरणविषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आले आहे. दोन जून रोजी महापालिकेचे ठाणे अतिरिक्त आयुक्त (1) सुनील चव्हाण यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे, सहा. आयुक्त मारुती गायकवाड़, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनिषा प्रधान, विज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ संशोधक ड़ॉ. देवीदास नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरणस्नेही उत्पादने हे या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य असल्याने महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून प्लास्टिक व थर्माकोलला पर्याय असलेली उत्पादन घेऊन जवळपास अनेक उत्पादक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. पर्यावरणाशी संबंधित विविध कल्पक पर्यावरणस्नेही वस्तूंशी संबंधित 40 स्टॉल्स या प्रदर्शनात लक्षवेधी ठरत आहेत. प्लास्टिक कच-याला चोख पर्याय म्हणून कागदी व कापड़ी पिशव्या, कागदी फुलं वापरुन केलेलं मखर,सुपारीची पानं, ऊसाच्या चिपाड़ापासून केलेले द्रोण, पत्रावळी, ग्लासेस, ज्युटच्या वारली नक्षीकाम केलेल्या पिशव्या, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले कपाट, सोफा सेट,ड़ायनिंग टेबल आदी वस्तू प्रदर्शनाचे आकर्षण ठरल्या आहेत.

घनकचरा व्यवस्थापन व पुनर्वापराचे तंत्र याचीही माहिती या प्रदर्शनात दिली जात आहे. विशेष म्हणजे स्वच्छता अभियानाबाबत जागृतीसाठी देखील स्टॉल उभारण्यात आला आहे. त्याद्वारे आोला व सुका कच-याचे वर्गीकरण करा, ओला कचरा प्लास्टिक पिशवीतून फेकू नका, ओला कच-याचे निर्माण स्थानिक खतात रुपांतर करा, प्लास्टिक ऐवजी कापड़ी पिशवीचा अवलंब करा, सुका कचरा पुर्ननिर्मितीसाठी पाठवा असेही आवाहन करण्यात आले आहे. निसर्गाला हानी न पोहचवणा-या किंवा पर्यावरणाची कमीत कमी हानी करणा-या वस्तू वापरल्यास आपण निसर्गाचा बचाव करु शकतो हा संदेश या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिला जात आहे.

सदर प्रदर्शनात थर्माकोलचे व्यवस्थापन या विषयावर आयोजित व्याख्यानालाही पर्यावरणप्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला. याशिवाय ओल्या कच-याचे व्यवस्थापन, सुका कच-याचे व्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा सोलार व्यवस्थापन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू वातावरणीय बदल आदी विषयांवरही व्याखानांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी कागदी व कापडी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण घेण्याची संधीही या प्रदर्शनात मिळणार आहे. याशिवाय पर्यावरण जनजागृतीपर लघुपट ही या चार दिवसीय प्रदर्शनात पाहण्याची संधी पर्यावरणप्रेमींना मिळणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email