प्रेमप्रकरणातून तरुणाला शेंदूर फासून गावभर धिंड काढली ; ६२ जणांवर गुन्हा दाखल
शिरूर – प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेल्याच्या रागातून मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरास बेदम मारहाण केली आणि त्याचे कपडे फाडून त्याला गुलाल, शेंदूर लावून गावातून धिंड काढल्याची धक्कादायक घटना शिरूर का. तालुक्यातील आर्वी येथे घडली. सदरील घटना माहिती झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत पिडीत तरुणाची सुटका केली. हि खळबळजनक घटना सकाळच्या सुमारास घडली.
याप्रकरणी आर्वी येथील २५ वर्षीय पिडीत तरुण अर्जुन (नाव बदलले आहे) याने फिर्यादीत नमूद केल्यानुसार त्याचे आणि गावातील प्रिया (नाव बदलले आहे) या तरुणीचे मागील वर्षभरापासून प्रेमसंबंध आहेत.
दि. २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास दोघांनी कोणालाही कळू न देता मोटारसायकलवरून औरंगाबादला पलायन केले. त्यानंतर ते दोघे पुणे, कोल्हापूर, पुणे आणि पुन्हा औरंगाबाद असे फिरले.
दि. २९ एप्रिल रोजी ते दोघे औरंगाबादमध्ये नक्षत्रवाडी येथील मित्राच्या घरी थांबले असता दुपारी ४ वाजताच्या सुमारास प्रियाचे कुटुंबीय आणि नातेवाईक दोन गाड्यातून तिथे आले. त्यांनी अर्जुन आणि प्रियाला एका गाडीत घातले आणि औरंगाबादच्या बाहेर पडले. वाटेत त्यांनी अर्जुनला हाताने आणि च्पालाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांनी प्रियाला रस्त्यातच एका नातेवाईकाच्या घरी सोडले आणि अर्जुनला घेऊन नारायणवाडी येथे आले. तोपर्यंत रात्रीचे दिड वाजले होते. तिथे अर्जुनला प्रियाच्या मामाच्या शेतातील झाडाल बांधून बांधून लिंबाच्या फोकाने जबर मारहाण करून डांबून ठेवण्यात आले.
सकाळी ६ वाजता अर्जुनला घेऊन ते सर्वजण आर्वी-निमगाव रस्त्यावरील पुलावर आले. तिथे गाडीतून खाली उतरवून त्यांनी अर्जुनचे कपडे काढले. त्याचे हात पाठीमागे बांधून त्याला आर्वी येथील बाजारतळावर, वेशीवर आणून उभे केले. अर्जुनच्या डोक्यावर व अंगावर गुलाल, शेंदूर फासून त्याला हलगी वाजवायला लावून त्याची गावातून धिंड काढण्यात आली. दरम्यान, हा प्रकार सुरु असल्याबद्दल शिरुर का. पोलिसांना माहिती झाल्याने त्यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून अर्जुनची सुटका केली आणि त्याला रायमोहा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असे अर्जुनने फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी अर्जुनच्या तक्रारीवरून १२ जणांचा नामोल्लेख करून तर अनोळखी ५० असे एकूण ६२ जणांवर कलम ३२३, ३४२, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ शिरूर का. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साभार – ABI News