प्रियकराचा लग्नास नकार, विवाहित प्रेयसीने केली हत्या
ठाणे – लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराची प्रेयसीनेच निर्घुण हत्या केल्याची घटना ठाण्यात घडली. कबीर अहमद लष्कर (२५) असे या हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर रूमा बेगम अन्वर हुसैन लष्कर (२८) असे आरोपी विवाहित महिलेचे नाव आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रेयसीला बंगळुरूमधून अटक केली असून लग्नास नकार दिल्याच्या रागातून हत्या केल्याची कबुली तिने दिली आहे.
ठाण्यातील कासारवडवली साईनगर, हनुमान गल्ली येथील एका बंद घरामधून १९ मार्च रोजी दुर्घंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. त्यानुसार कासारवडवली पोलीसांनी ते घर उघडल्यानंतर त्यांना एका तरुणाचा सडलेला मृतदेह सापडला. डोक्यात विट मारून गळा आवळून त्याचे गुप्तांग कापून अत्यंत निर्घुण पध्दतीने हत्या केली होती.
कबीर हा आसाम येथील रहिवासी होता. हत्येच्या अगोदर एक महिला या घरात येऊन गेल्याचे पोलिसांना शेजाऱ्यांकडून कळाले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलीस निरिक्षक दत्तात्रय ढोले यांच्या पथकाने तपास केल्यानंतर ही महिला कर्नाटकमधील असून, १६ मार्चला भेटायला येऊन १८ मार्चला ती पुणे मार्गे विमानाने बंगळुरूला रवाना झाल्याचे समजले. त्यानुसार, पोलीस पथकाने बंगळुरू येथील तिच्या घरातून तिला ताब्यात घेतले.
कर्नाटकमधील अनीकल जिल्ह्यात ती राहत असताना सायकल स्टोअरमध्ये कामाला आलेल्या कबीरशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. दोघांनीही विवाहासंबंधी बातचीत केली. कबीरने तिला ठाण्यात बोलावून घेतले होते. तेव्हा, कबीरच्या आश्वासनाला भुलून ती पळून त्याच्याकडे आली होती. परंतू, ठाणे येथे गेल्यानंतर कबीरने लग्नास नकार दिल्याने तिने रागातून डोक्यात विट घालून गळा दाबला. तसेच त्याचे गुप्तांग छाटून त्याच्या तोंडामध्ये उंदराचे औषध कोंबल्याची कबुली तिने दिली. दरम्यान न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.