प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज राहणार नाही – राज ठाकरे
मनसेचा मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला. मराठी मुलांना नोकरीत प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज राहणार नाही. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच मिळायला हवे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात केले. मराठा समाजाने ज्या प्रकारे मोर्चे काढले त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडू नका. हकनाक स्वतःचा जीव गमावू नका असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले. जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे. सरकार तुमच्या भावनांशी खेळ करते आहे त्यांच्या आश्वासनांना आणि राजकारणाला बळी पडू नका अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
काकासाहेब शिंदे या मुलाने नदीत उडी मारली. अशा प्रकारच्या घटना टाळा, जीव गमावून काहीही होणार नाही. जातीच्या आधारावर आरक्षण दिले तर जातीय तेढ निर्माण होईल. एका जातीला आरक्षण दिले तर दुसऱ्या जातीला द्यावे लागेल. मराठी मुला-मुलींनी या मागचे राजकारण काय सुरू आहे ते समजून घ्या असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
मी इथे काही होर्डिंग्ज पाहिली. गुरू पौर्णिमा मेळावा, या मेळाव्याचा गुरु पौर्णिमेशी काहीही संबंध नव्हता. ही होर्डिंग्ज पाहूनच मला चित्र समोर आले की मी गंध लावून आशीर्वाद देत बसलो आहे की काय? या दिवसाचा आणि मेळाव्याचा काहीही संबंध नाही. मेळावा घ्यायचा होता म्हणून मेळावा घेतला. अशी टीका करत पुण्यात होर्डिंग लावणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही शेलक्या शब्दात राज ठाकरेंनी झापले. मी इथे गुरुमंत्र वगैरेही काहीही देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.