प्राण्यांची बदनामी आणि आयडीयाची कल्पना…

प्राण्यांची बदनामी आणि आयडीयाची कल्पना…

(शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉलवरून साभार )

वनाधिराज सिंह यांनी विशेष सभा बोलाविलेली असते. जंगलातील सर्व प्राणी-पक्षी त्यातही विशेष करुन कोल्हा, लांडगा, डुक्कर, गेंडा, कुत्रा, गाढव, बैल, वटवाघुळ, माकड, कावळा, घुबड, साप, विंचू, अजगर, सरडा, गांडुळ आदी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सभेला सुरुवात होते.

वनाधिराज सिंह- बोला, प्रत्येकाने मनमोकळेपणाने बोला. खास तुमच्यासाठीच आजची ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

गेंडा- गेल्या काही वर्षात सर्वसामान्य नागरिकांकडून राजकारण्यांना नावे ठेवताना सारखी माझी आठवण काढली जाते. एकसारखा माझ्या कातडीचा उल्लेख केला जात असल्याने माझीच त्वचा खूप संवेदनशील झाली आहे. त्यामुळे कोणी काही बोलले की ते मलाच लागते.

कुत्रा, गाढव, कोल्हा, लांडगा- सिंह महाराज हो, गेंडा म्हणतो ते खरे आहे. हे सर्वपक्षीय राजकारणी कसेही वागतात आणि बदनामी मात्र आपली होते. तो गेंडा बिचारा किती हळवा झालाय ते पाहा.ना. एक सारखे गेंड्याची कातडी, गेंड्याची कातडी म्हणून त्या बिचाऱयाला अगदी हिणवत असतात. हो.

बैल आणि गाढव- महाराज गेंड्यासारखीच आमचीही बदनामी होत असते. सर्वसामान्य माणसे असोत की सर्वपक्षीय राजकारणी दोघांकडूनही आम्हाला इतक्या शिव्या मिळतात की त्या शिव्या खाऊनच आमचे पोट भरते.

साप, अजगर, सरडा, गांडुळ- महाराज आमचीही हीच व्यथा आहे. आम्ही आपले गरीब सरपटणारे प्राणी आहोत. कोणाच्या अध्यात ना मध्यात. पण या राजकारण्यांनी आम्हालाही सोडलेले नाही. आमच्या नावाचाही सतत उद्धार सुरु असतो.

वनाधिराज सिंह- हो, हो, अगदी बरोबर आहे तुमचे. तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.

(तेवढ्यात वाघोबा डरकाळी फोडत येतात) महाराज, अलिकडे मलाही वाघोबा थंड झाला, वाघाची मावशी झाली, वाघ माणसाळला, पूर्वीचा वाघ आता राहिलेला नाही तो फक्त चौकडीचेच ऐकतो, राजीनामे खिशात घेऊन फिरतो असे काही बाही बोलले जाते.

वनराज सिंह- हो मी ही ते ऐकले आहे.

उपस्थित सर्व प्राणी- काल वांद्रे- कुर्ला संकुलात झालेल्या सभेत पुन्हा एकदा या सगळ्याची उजळणी झाली. आत्ताचे सत्ताधारी पूर्वी विरोधक होते आणि आत्ताचे विरोधक पूर्वी सत्ताधारी होते. त्यांच्या भूमिका दर पाच वर्षांनी बदलत असतात. खरे तर या सर्वपक्षीय राजकारण्यांकडून नेहमीच आणि निवडणुक जवळ आली की अधिक प्रमाणात आपली बदनामी केली जाते.

गाढव- महाराज, आपण या सगळ्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर

कोल्हा आणि लांडगा- (जोरजोरात हसतात आणि एका सूरात म्हणतात) गाढवच आहेस अगदी. अरे ज्यांना अब्रू असते त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर ठिक आहे. इथे काही सन्मान्य अपवाद वगळता (आत्ताच्या राजकारणात तसे कठीणच आहे) कोणा सर्वपक्षीय राजकारण्यांना अब्रू आहे. अरे गाढवा ही सर्व मंडळी लाज आणि अब्रू अगदी कोळून प्यायली आहेत. यांच्यावर कसला अब्रुनुकसानीचा दावा ठोकायचा.

वाघ- हो. अगदी बरोबर आहे. अरे आपण एकमेकांचे हाडवैरी असलो तरीही सभ्यतेचे काही संकेत नेहमी पाळतो. पण हे राजकारणी. एकमेकांशी असे काही गोड बोलतात आणि केसाने गळा कापतात. त्या बिचाऱया ‘बाहुुबळा’चे
काय झाले पाहा ना, पूर्वी अगदी ढाण्या वाघ होता तो. पण पक्ष बदलला आणि बिचाऱयाच्या नशिबी वनवास आला. साहेबांनी स्वतच्या पुतण्याला वाचविण्यासाठी त्याचा बळी दिला. तिकडे ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणविणाऱयांचेही काही वेगळे नाही. कॉंग्रेसमुक्त भारत म्हणता म्हणता निवडणूक काळात त्यांचा पक्ष कॉंग्रेसयुक्त होतो. आयारामांना पायघड्या आणि निष्ठावंतांचे पायपुसणे केले जाते. तर तो इंजिनवाला आता त्याचे इंजिन चालत नाही, आणि बंद पडेल या भीतीने साहेबांच्या नादी लागला आहे. साहेब त्याला कधी कात्रजचा घाट दाखवतील हे त्यालाही कळणार नाही. अरे अशाने तुझे इंजिन कायमचे रुळावरुन खाली येईल. भारतातील सर्वात जुना पक्ष म्हणवून घेणाऱयांची तर पार वाट लागली आहे. त्या नव्या अध्यक्षाच्या ‘हाता’ने ही चमत्कार घडेल असे मला वाटत नाही.

वनाधिराज सिंह- वाघोबा, थांब, थांब. अरे आपला विषय काय आणि तू बडबड करतो आहेस वेगळ्याच विषयावर. अगदी राजकारणी असल्यासारखा. मंडळी आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ. तर सर्वपक्षीय राजकारणी आपली नावे घेऊन आपल्याला बदनाम करतात, त्यासाठी आपण काय करायचे हा आपल्या चर्चेचा विषय आहे.

इतर सर्व प्राणी- हो, हो बरोबर आहे. एकमेकांचा केसाने गळा कापायला, पाठीत खंजीर खुपसायला, मौत का सौदागर म्हणायला आणि एकमेकांना शिव्या घालून पडद्याआड एकमेकांच्या गळ्यात गळे घालायला आपण काही राजकारणी नाही.

वनराज सिंह- बोला तर मग काय करु या आपण आता

सर्व प्राणी- महाराज आम्ही सर्वाधिकार तुम्हालाच देतो. तुम्ही जे म्हणाल ते आम्हााला मान्य आहे.

वनाधिराज सिंह- ठिक आहे. तर आता मी काय सांगतो ते ऐका. आजपासून एक नियम करु या. एकमेकांना शिव्या घालायच्या असतील तेव्हा आपण सर्वांनी आपल्याला वाटेल त्या सर्वपक्षीय राजकारण्याचे खरे नाव किंवा त्याचे प्रचलित असलेले टोपण नाव घ्यायचे आणि शिव्या द्यायच्या. ती मंडळी नावे घेऊन आपली बदनामी करत असतील तर आपणही त्यांची नावे घेऊन बदनामी करु या. चालेल.

सर्व प्राणी (एका सूरात)- हो, चालेल, चालेल. मंजूर आहे.

वनाधिराज सिह- चला तर मग आपण आता ‘देश की बहू’, ‘पप्पू’, ‘चहावाला’, ‘शहा’णा, ‘बारामतीकर’, ‘मोडका इंजिनवाला’, ‘ओरडेंद्र’,’नकली वाघोबा’, ‘धरणवाला लघुशंकाकर’, अशा नावाने त्यांची बदनामी करु या…

वनाधिराज यांच्या या घोषणेनंतर जंगलात एकच आनंदकल्लोळ होतो आणि त्या आनंदात ही विशेष सभा समाप्त होते.

-शेखर जोशी
७ एप्रिल २०१८

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email