पोलीस पाटलांचे मानधन एका महिन्यात वाढणार- धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर गृह राज्यमंत्र्यांचे आश्वासन
नागपूर दि.२० – राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणेबाबत एक महिन्याच्या आत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.
नियम ९३ अन्वये धनंजय मुंडे यांनी राज्यातील पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, हंगामी पोलीस पाटलांना कायम करणे, सेवानिवृत्तीनंतर वारसास सेवेत सामावुन घेणे, सेवेची कालमर्यादा वाढविणे, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी-सवलती देण्यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पोलीस पाटलांसह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, कोतवालांच्या मागण्यांचा एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याकरिता एकछत्र योजना तयार करण्यासाठी नेमलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असल्याचे सांगितले. त्यावर महागाई प्रचंड वाढली आहे. अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी करायची तेव्हा करा, आधी पोलीस पाटलांचे मानधनात वाढ करा, अशी मागणी श्री. मुंडे यांनी करून मागील काळात अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविले नव्हते का, याकडे लक्ष वेधले. त्यावर पोलीस पाटलांचे मानधनही एका महिन्यात वाढविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ याचा राज्यमंत्र्यांनी पुनरूच्चार केला. ज्येष्ठ सदस्य आ. सुनिल तटकरे यांनीही पोलीस पाटलांच्या इतर मागण्यांबाबत कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी केली.