पोलिसांनी केला डॉक्टरकडून १० लाख उकळण्याचा प्रयत्न

नागपूर : एका डॉक्टरला कारवाई तसेच बदनामीचा धाक दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांना सेवेतून निष्कासित (डिसमिस) करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी गैरप्रकाराची गय करणार नाही, असा इशारा या कारवाईतून दिल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक प्रवीण घोडाम, रवीराज हलामी तसेच पोलीस शिपायी संदीप धोंगडे आणि तुषार सोनोने अशी निष्कासित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

प्रकरण ४ वर्षांपूर्वीचे आहे. २०१५ मध्ये हे चौघे प्रतापनगर ठाण्यात कार्यरत होते. या चौघांनी संगनमत करून प्रतापनगरातील एका डॉक्टरकडे रात्रीच्या वेळी धडक दिली होती. तुमच्याकडे गैरप्रकार चालतात, अशी धमकी दाखवून डॉक्टरांच्या कर्मचाऱ्यांना कोठडीत टाकण्याचा धाक दाखवला होता. डॉक्टर यावेळी त्यांच्या घरी होते. त्यांचा एक कर्मचारी पोलिसांची डॉक्टरच्या चेंबरमध्ये समजूत काढत असताना या पोलिसांनी त्याला शिवीगाळ करून आपल्या वाहनात बसण्यास सांगितले. त्याला डॉक्टरला बोलविण्यास सांगितले. डॉक्टरने संपर्क साधला असता आरोपी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचे दडपण आणले. सोबत मीडिया आहे, त्यामुळे बदनामीही होईल, असा धाकही दाखवला. प्रकरण दाबायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, असे आरोपी म्हणाले.

पोलिसांकडून प्रचंड दडपण आल्याने आणि आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो, हे ध्यानात आल्यामुळे बदनामी टाळण्यासाठी डॉक्टरने रात्रीच्या वेळी आरोपी पोलिसांना ३ लाख रुपये दिले. तीन लाख मिळाल्यामुळे निर्ढावलेल्या आरोपी पोलिसांनी डॉक्टरला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. सात लाख रुपयांसाठी आरोपींनी डॉक्टरमागे तगादा लावला होता. रक्कम मागणारा पीएसआय घोडामची डॉक्टरने रेकॉर्डिंग केली. त्या आधारे एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने सापळा रचून घोडामेला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. यानंतर या चौघांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीत पोलीस उपनिरीक्षक घोडाम, हलामी, शिपायी धोंगडे आणि सोनोने हे दोषी असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी या चौघांना पोलीस सेवेतून बरखास्त करण्याचे आदेश काढले. या कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email