पीडित मुलीला दहा लाखाची मदत द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चाचे आयोजन
सिंधुदुर्ग दि.०७ – मळगाव येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीला शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या नियमाप्रमाणे दहा लाखांची मदत देण्यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवावा, अशा विविध मागण्यासंदर्भात ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने येथील पोलीस उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मनसे नेते गिरीश सावंत, सरचिटणीस परशुराम उपरकर, उपाध्यक्ष स्नेहल जाधव व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा मोर्चा गवळी तीठा ते पोलीस उपविभागीय कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. यावेळी ज्या लॉजवर ही घटना घडली त्याचे मालक व सर्व आरोपी यांना कडक शिक्षा होण्याकरता खटला फास्ट ट्रॅक वर घेण्यासाठी तज्ज्ञ वकील नेमणे तसेच पीडित मुलीला शासनाच्या महिला बालकल्याण विभागाकडून दहा लाखाची मदत देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी मनसे करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.