पावसाळ्यात वीज,रेल्वेशी संबंधित तक्रारी तत्काळ सोडवाव्यात – पालकमंत्री एकनाथ शिंदे

आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे 

ठाणे – मान्सूनच्या काळात ठाणे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत विशेषत: महावितरण, रेल्वे या विभागांनी अधिक दक्षता बाळगावी तसेच येणाऱ्या तक्रारी तत्काळ सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नियोजन भवन सभागृहात झालेल्या बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने काल सर्व पालिका, नगरपालिका, रेल्वे, महावितरण, लष्कर , विविध विभाग यांनी पावसाळ्याच्या कालावधीत केलेल्या नियोजनाचा आढावा घेणारी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात पालकमंत्री यांनी सर्व विभागांना आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत गांभीर्याने काम करण्याच्या सुचना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार,अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार पोलीस उप अधीक्षक प्रशांत कदम, हवामान विभागाचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सादरीकरण केले व आपत्ती व्यवस्थापन कायद्यात कामात हयगय करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद असल्याची माहिती दिली. .

पावसाळ्यात बऱ्याचदा वीज खंडित होण्याचे प्रकार घडतात अशा वेळी महावितरणच्या फ्यूज कॉल सेंटर्स आणि नियंत्रण कक्षातील दूरध्वनी सुरु राहिले पाहिजेत असे स्पष्ट करून पालकमंत्री म्हणाले उघड्या वायर्स, डीपी यामुळे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत, वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच ग्रामीण भागातही वीज पुरवठा खंडित होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. ठाणे जिल्ह्यातील मध्य रेल्वे चे मार्ग पावसात दिवा, कळवा, ठाणे परिसरात पाण्याखाली जातात, सिग्नल यंत्रणा नादुरुस्त होते, असंख्य प्रवाशाना याचा त्रास होतो, हे लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी सतर्क राहून नाले साफ राहतील व पाणी तुंबणार नाही हे काळजीपूर्वक पाहावे

स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी

जिल्हा प्रशासनाने तसेच पालिकांनी देखील आपत्ती आल्यास जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांची मदत घ्यावी असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, अशा वेळी पट्टीच्या पोहणाऱ्यांची तसेच कोळी बांधवांची देखील खूप मदत होते. होमगार्ड्स, एनसीसी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांचे संपर्क क्रमांक प्रत्येक संस्थेने बाळगावे जेणे करून त्यांना बोलविता येऊ शकेल.

यावेळी पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाला देखील धरण क्षेत्रात पाणी वाढत असल्यास तत्काळ इशारा देऊन परिसरातील लोकांना संबध करावे तसेच कृषी विभागाने देखील अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने तहसीलदारांच्या समन्वयाने पिकांचे पंचनामे हाती घ्यावेत असे सांगितले. लघु पाटबंधारे विभाग धरण क्षेत्रातील पाउस व सोडण्यात येणारे पाणी याबाबत २८ नियंत्रण कक्षांद्वारे दररोजच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती  श्री पवार यांनी माहिती दिली.  

पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लष्करी तुकडीत ५८ जण असून तसा दोन तासात त्यांनी कुमक मदतीसाठी ठाणे जिल्ह्यात येऊ शकते असे अधिकाऱ्यांनी सांगितले तर एनडीआरएफच्या १२० जवानांचे पथक अर्ध्या तासांत अंधेरीहून ठाणे येथे पोहचून मदतकार्य सुरु करू शकते अशी माहिती देण्यात आली. एनडीआरएफच्या जवानांसाठी ठाणे येथेच राहण्याची सोय उभारण्यासाठी ठाणे पालिकेला पाठपुरावा करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. वालधुनी येथे बोटींची व्यवस्थाही करावी असे ते म्हणाले.

जिल्ह्यात साथ रोग पसरू नयेत म्हणून आरोग्य विभागाने काळजी घ्यावी व पुरेशी औषधे उपलब्ध असतील असे पाहावे असेही त्यांनी यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ केम्पी पाटील यांना सांगितले.

ग्रामसेवक तसेच कृषी विभागाशी  संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे असे सांगितल्याचे जिल्हा परिषद कृषी अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे यांनी सांगितले.

प्रत्येक पावसाळ्यात माळशेज घाटात दरडी कोसळतात , याविषयी चिंता व्यक्त करून पालकमंत्री म्हणाले कि, राष्ट्रीय महामार्ग विभागाने याठिकाणी पावसाळ्यात  कर्मचारी सतत उपलब्ध ठेवावेत. मुंब्रा बायपासचे काम सुरु आहे त्यामुळे याठिकाणीही दरडी कोसळणार नाही याची काळजी घ्यावी असे ते म्हणाले.

पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासणार

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार म्हणाले कि जिल्हा परिषद यंत्रणा पूर्णत: सज्ज असून ग्रामसेवक व पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे. पाण्यापासून होणारी रोगराई टाळण्यासाठी सातत्याने पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येत आहे.

अन्यथा कारवाई

जिल्हा प्रशासनाने तहसीलदार स्तरांवर बैठका घेतल्या आहेत . जिल्ह्यात ३२ पर्जन्यमापक यंत्रे असून पालिकांची २४ पर्जन्यमापक यंत्रे आहेत. सर्व यंत्रणांनी स्म्नावाय्ने काम करावयाचे असून विभागप्रमुखांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे जबाबदारी आहे, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय मुख्यालय सोडायचे नाही असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सांगितले. या कायद्यान्वये दंड आणि इतर कडक कारवाईची तरतूद कायद्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.

कृष्णानंद होसाळीकर, भिवंडी निझाम्पूर पालिका आयुक्त मनोहर हिरे, ठाणे मनपा उपायुक्त संदीप माळवी तसेच इतर अधिकाऱ्यांनी देखील नियोजन सादर केले. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email