पश्चिम डोंबिवलीच्या मोठागाव, देवीचा पाडा, रेतीबंदर, कुंभारखाणपाडा, आदी भागात जलकोंडी

मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीतील काही परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम डोंबिवलीच्या मोठागाव, देवीचा पाडा, रेतीबंदर, कुंभारखाणपाडा, आदी भागात जलकोंडी झाली आहे. या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बैठ्या चाळींचे स्तोम माजले आहे. सामान्य नागरिक अशा चाळींत वास्तव्यास आहेत. चाळी आणि रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे या चाळींतील रहिवाश्यांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या संदर्भात आपण केडीएमसी प्रशासनाला सर्व माहिती दिली आहे. मात्र प्रशासनाने अद्याप या गंभीर बाबीकडे लक्ष दिलेले नसल्याची तक्रार शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामनराव म्हात्रे यांनी सांगितले.

उल्हास नदी खोरे, श्रीमलंग डोंगरातून पावसाचे पाणी कल्याण परिसरात वालधुनी, उल्हास नदीतून येते. त्यामुळे या नदीकिनारी पूरपरिस्थिती निर्माण होते. उल्हासनगर, कल्याणमधून वाहत असलेल्या वालधुनी नदीकिनारी अनेक झोपडीधारकांनी नदी पात्रात झोपड्या बांधल्या आहेत. या झोपड्यांची जोती दुतर्फा वाहत असलेल्या पाण्यामुळे पाण्याखाली गेली आहेत. या झोपड्यांमधील रहिवाशांनी रेल्वे स्थानके, उड्डाण पुलाखाली आसरा घेतला आहे. डोंगरांचे कोपरे खणून नेतिवली टेकडी भागात झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. पावसामुळे डोंगर भुसभुसीत होऊन दरडी कोसळण्याची भिती असल्याने या भागातील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. जरीमरी नाला, खडेगोळवली, काटेमानिवली शहरातील इतर नाले भरभरून वाहत आहेत. टिटवाळा, मांडा भागांत कोणतेही नियोजन न करता बेकायदा चाळी, इमारती बांधण्यात आल्या आहेत. सरकारी, वन जमिनीवर माळरानावर, शेतात ही बांधकामे करण्यात आल्याने या बांधकामांच्या चोहोबाजूने पाणी साचले आहे. त्यामुळे रहिवाशांना घरात अडकून पडावे लागले होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email