पर्यावरण रक्षणासाठी दिवे बंद ठेवण्याचे आवाहन

जगभरात आज रात्री एका तासासाठी लाईट होणार गुल…

(म.विजय)

जगभरातील ऊर्जा संबंधी आणि पर्यावरणाबाबत काळजी असलेली प्रत्येक व्यक्तीकडून अर्थ अवर ही मोहिम राबवण्यात येते. या मोहिमेनुसार, यंदा जगभरात अर्थ अवरचा हा दिवस शनिवार, २४ मार्च रोजी स्थानिक वेळेनुसार रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत पाळण्यात येणार आहे. त्यामुळे आज या वेळेत दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वेळेत घर, परिसर, कार्यालये आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांवरील दिवे बंद करुन त्याऐवजी मेणबत्तीच्या उजेडाचा वापर केला जाणार आहे.

ऊर्जा प्रश्न आणि पर्यावरणासंबंधी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच विजेचा वापर विचारपूर्वक करण्यासाठी वर्ल्ड वाईल्ड फंड (WWF) या संस्थेकडून ‘अर्थ अवर’ ही पर्यावरण रक्षणासाठी जागतिक मोहिम दरवर्षी चालवली जाते. ही मोहिम सन २००७मध्ये सुरु झाली, ती १७८ देशांत दरवर्षी ती पाळली जाते. या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी विविध व्यासपीठांवर वारंवार आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, भारतातही अर्थ अवर मोहिमेला मोठा पाठींबा मिळत असून यावर्षी आजचाच हा दिवस असल्याने केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी देशातील जनतेला या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. २४ मार्च रोजी देशातील नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत आपल्या घरातील अनावश्यक दिवे घालवून ऊर्जा बचत करावी असे आवाहन केले आहे. या वेळेत दिवे न वापरण्याची कृती आपण स्वतः देखील करणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘अर्थ अवर’ या मोहितील “Give Up to Give Back” या टॅग अंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी लोकांनी आपल्या चुकीच्या सवयी, जीवनशैली तसेच पर्यावरणावर येणारा ताण कमी करण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे आवाहन WWFकडून करण्यात आले आहे. यामध्ये प्लॅस्टिकचा वापर बंद करणे, जैविक इंधनाचा वापर टाळणे, एकट्याने कारमधून प्रवास करणे तसेच ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email