परवानगी काढली नसल्याने प्रवासी संघटनेला रेल्वे पोलिसांनी हुसकावले ..
डोंबिवली :- दि. १६ ( प्रतिनिधी ) रेल्वे प्रशासनाचा कामकाजावर नाराजी व्यक्त करून महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेने डोंबिवली पूर्वेकडील रामनगर तिकीट खिडकीजवळ मूक मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांची पूर्व परवानगी न घेता मोर्चा काढल्याने पोलिसांनी संघटनेच्या ९ महिला आणि ३ पुरुष पदाधिकाऱ्यांना अटक करून सोडून देण्यात आले. यावेळी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी परवानगी नसल्याने त्यांच्या हद्दीत मोर्चा काढण्यास मनाई करत हुसकावले होते.
भावेश नकाते, धनश्री गोडवे आणि रजनीश सिंग यांचा लोकल मधील गर्दीचा बळी गेल्याने याला रेल्वे प्रशासन जबाबदार ठरवत सोमवारी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना कल्याण पश्चिमेकडील तिकीट खिडकीजवळ आणि डोंबिवली पूर्वेकडील रामनगर तिकीट खिडकीजवळ जाहीर निषेध करत मूक मोर्चा काढला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या फीत बांधून निषेध व्यक्त केला. वारंवार होणारे रेल्वे अपघात, दिवसेदिवस लोकलमधील वाढत असलेली गर्दी, ब्रिटीशकालीन यंत्रणा,रेल्वे कामगारांची कपात आदि बाबीवर रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अश्या प्रकारे निषेध करावा लागत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अभिजित धूरत यांनी यावेळी सांगितले.मात्र रामनगर पोलीस ठाणे आणि डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याची परवानगी काढली नसल्याने आपल्यावर अश्या प्रकारे कारवाई होत असून लोकशाहीत निषेध पण व्यक्त करू शकत नाहीं का असा प्रश्न संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.