निर्मल युथ फाउंडेशन – निसर्गाला नवीन संजीवनी देण्याचा एक लहान प्रयत्न

निसर्गाने आपल्याला सर्व दिले आहे . स्वच्छ हवा , स्वच्छ पाणी , स्वच्छ सूर्यप्रकाश आणि अन्न आपण निसर्गातूनच मिळवतो . या सर्व गोष्टी निसर्गाने कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मानवजातीला बहाल केल्या आहेत आणि आपण याबाबत निसर्गाचे सदैव ऋणी आहोत .

आपल्या हातून कळत आणि नकळत अनेक गोष्टी घडतात ज्यातून निसर्गाची हानी होते आणि पर्यावरणाचा समतोल बिघडतो . परिणामी ग्लोबल वॉर्मिंग आणि जल प्रदूषण , वायुप्रदूषण याचा आपल्यालाच त्रास होतो . या सर्व बाबींचा खोलवर विचार करून कृतार्थ भावनेने या निसर्गाच्या हानीला थांबवण्यासाठी खारीचा वाटा म्हणून ” निर्मल युथ फाउंडेशन ” या संस्थेअंतर्गत निर्माल्य गोळा करून त्याचा पुनर्वापर करून निसर्गाला नवीन संजीवनी देण्याचा एक लहान प्रयत्न आहे .

श्री गणेश हे संपूर्ण भारताचे आराध्य दैवत . सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशी ख्याती असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पांचे आपल्यासर्वांकडे आगमन होते . मोठ्या उत्साहाने , श्रद्धेने आपण गणेशमूर्तीचे आगमन करतो आणि पाणावलेल्या डोळ्यांनी व जड अंतकर्णनाने पुढच्या वर्षी लवकर या सांगून त्यांचे विसर्जन करतो या दिवसांत आपण अनेक फुले , हार , सजावट करतो जी आपण कधी कचर्यात टाकतो किंवा विसर्जन करताना जवळच्या वाहत्या पाण्यात किंवा कृत्रिम तलावांत सोडून देतो . पण आपण यापुढचा विचार न करता परत आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त होतो.

कळत नकळतपणे आपण आपले पाण्याचे स्रोत असलेले नदी , खाडी किंवा विहिरी आणि तलाव या निर्माल्यांनी दूषित करतो परिणामी त्याचे विघटन होत नाही , पाणी प्रदूषित होते , वॉटर लॉगिंग होते व पावसाळ्यात पाणी साठायला कारणीभूत ठरते आणि सर्वात दुःखाची बाब म्हणजे हे चक्र दरवर्षी असेच सुरु राहते . निर्मल युथ फाउंडेशन संस्थे तर्फे हेच निर्माल्य आणि त्यासोबत पर्यायाने येणारे प्लास्टिक पाण्याच्या स्रोतात मिसळू न देता त्याचा पुनर्वापर करून सेंद्रीय खत निमिर्ती साठी उपयोग करण्याला सुरुवात करण्यात आली . श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येणाऱ्या सर्व ठिकाणी , खाडीजवळ तसेच कृत्रिम तलाव येथे संस्थे कडून आवश्यक मनुष्यबळ पुरवून तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी मास्क , ग्लोव्हस आणि इतर साहित्य वापरून , त्यांचे विघटनशील आणि अविघटनशील असे वर्गीकरण करून हार फुले वेगळे आणि प्लास्टिक वेगळे करण्यात येते आणि निर्माल्य खत निमिर्ती साठी पाठवले जाते व इतर कचऱ्याची योग्यरितीने विल्हेवाट लावण्यात येते.

अशा प्रकारे दीड दिवस , पाच दिवस , सात दिवस आणि अकरा दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी तसेच मधल्या दिवसांत गणेश मंडळाच्या मंडप मधून येथून निर्माल्य गोळा केले जाते व जलस्तोत्रांत जाण्यापासून वाचवन्यात येते. निर्माल्य पुनर्वापराचे संस्थेचे यंदाचे ३ रे वर्ष.

या वर्षी महाराष्ट्राचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्वच्छता निरीक्षक चिंतामण मानकर, दीप अकादमीचे संस्थापक निलेश अडकमोल, मा. नगरसेवक , मा. स्थायी समिती सभापति कल्याण जिल्हा युवा सेना अधिकारी दिपेश म्हात्रे, अध्यक्ष ,भा. ज. प. युवा मोर्चा पवन पाटील आणि क.डो.म.पा. घन कचरा व्यवस्थापन विभाग, डोम्बिवली , आमच्या संस्थेच्या कार्याची दखल या मान्यवरांनी घेऊन मोलाचे सहकार्य करून या कार्यास हातभार लावला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत.

डोंम्बिवली पश्चिम येथील कोपर गाव , गणेश घाट जूनी डोम्बिवली , कुंभारखण पाडा , सातपुल जेट्टी , गणेश घाट रेतीबंदर येथे निर्माल्य संकलन केंद्रे उभारण्यात आली होती . प्रत्येक केंद्रावर साधारण २५ तरुण स्वयंसेवक यांची टीम नेमण्यात आली होती. या श्री गणेश उत्सवात सुमारे ६० टन निर्माल्य व १८ टन प्लास्टिक तसेच ६ टन इतर घन कचरा गोळा करण्यात आले व आपले जलसाठे प्रदूषणविरहित ठेवण्यास व स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले . या कार्यात साउथ इंडियन असोसिएशन , प्रगति, के.वि.पेंढारकर या तीन महाविद्यालयाचे NSS चे १५० स्वयंसेवक व निर्मल युथ फाउंडेशन चे ५० स्वयंसेवक सहभागी होते. “निसर्ग खुलवू आनंदाने, खत बनवू निर्माल्यने” या ब्रीद वाक्यासोबत डोम्बिवली या सांस्कृतिक शहरातील जलप्रदूषण न होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email