नाशिक पोलिसांच्या कारवाईत मोठा एमडी ड्रग्ज साठा जप्त सुत्रधार गजाआड..

बोईसर तारापुर औद्योगिक वसाहतीत बनते एमडी ड्रग्ज

नाशिक येथील कारवाई नंतर ड्रग्ज बनविण्याचे कनेक्शन बोईसर भागातून असल्याचे उघड

पालघर – तारापुर औद्योगिक वसाहत व बोईसर परिसरात गुन्हेगार सोबतच अमलिपदार्थ बनवणारे रँकेट सक्रिय झाले असुन सुरक्षा यंत्रणेचे तिन तेरा वाजले आहेत.बोईसर भागात बनवलेले एमडी ड्रग्ज थेट नाशिक येथे पोचले अन सतर्क नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना पाथर्डी फाटा येथे पकडले.त्यामुळे नाशिक मध्ये मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दापाश करण्यात नाशिक पोलिसांना यश आले असून या ड्रग्ज चे कनेक्शन तारापुर औद्योगिक वसाहती लगत बोईसर भागात असल्याचे उघड झाले आहे.१६ मे रोजी पाथर्डी फाटा परिसरातून नाशिक गुन्हे शाखाेच्या पथकाने एका सफारी कारमधून प्रवास करणाऱ्या रणजित मोरे, पंकज दुंडे आणि नितीन माळशेदे या तिघांकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत केले होते. त्यांच्यावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमडी ड्रग्स तयार करुन त्याची विक्री करणाऱ्या व्यक्तिला जो (असिस्टंट रिसर्च सायंटीस्ट) आहे त्यास नाशिक क्राईम ब्रँचने उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगरमधून अटक केली आहे.एमडी ड्रग्जची ज्या ठिकाणी निर्मिती केली जात होती, ते ठिकाण पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक क्षेत्र लगत बोईसर भागात देखील पोलिसांनी धाड टाकून ते ठिकाण ही उद्ध्वस्त करण्यात आले आहे.
सदर गुन्हाचा तपास चालू असतानाच एमडी ड्रग्जचे मुंबई कनेक्शन बाबत माहिती समोर येताच पोलिसांच एक पथक मुंबईला रवाना झाले आणि त्यांनी मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात सापळा रचून नदीम सलीम सौरठिया आणि सफैउल्ला फारूक शेख या दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडून ४४ लाख रुपये किमतीचे तब्ब्ल २२००ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले.हे ड्रग्स ते ज्या व्यक्तीकडून खरेदी करत होते, तो अरविंद कुमारला मुझफ्फरनगरमध्यून अटक करण्यात आली आहे. तो फरार झाला होता त्याच्या शोधासाठी क्राईम ब्रँचचं एक पथक मुझफ्फरनगरला रवाना झालं होतं आणि अखेर सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आलं. त्याला पोलिसी हिसका दाखवताच साथीदाराच्या मदतीनं त्याने बोईसर मध्ये एका घरातच एमडी ड्रग्स बनवण्याची प्रयोगशाळा सुरु असल्याची कबुली दिली.त्यानुसार पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने बोईसर गाठत अरविंदकुमारचा साथीदार हरिश्चंद्र पंत याला ताब्यात घेत, ४५०० ग्रॅम एमडी ड्रग्ज, एम डी तयार करण्यासाठी लागणारी १८ किलो क्रूड पावडर आणि प्रयोगशाळेतील इतर साहित्य असा एकूण १ कोटी ८० लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले आहे.
विशेष म्हणजे यातील मुख्य सूत्रधार अरविंदकुमार हा मागील १० वर्षांपासून फार्मासुटिकल क्षेत्रात काम करत असून त्याने एमएससी (ऑरगॅनिक केमिस्ट्री) च शिक्षण घेतलं आहे. त्याने असिस्टंट रिसर्च सायंटीस्ट म्हणून देखील काम केल्याच पोलीस तपासात समोर आलं,तर अरविंदकुमारचा साथीदार हरिश्चंद्र उर्वादत्त पंत वय वर्षे २४ हा देखील बीएस्सीच शिक्षण घेत असून हरिश्चंद्र पंत  ४०२, यशवंत सृष्टी,बि.नं ४,ठाकुर गँलँक्सी,बोईसर (प)येथे राहत होता व एक वर्षांपासून कंपोहर पार्मा कंपनीत काम करत आहे.एकंदरीतच १६ मे ते २६ मे या दहा दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी ही सगळी कारवाई करत एकूण ७ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर २५ किलो एमडी ड्रग्ज, ९० लाख रुपयांची जॅग्वार सह एक सफारी कार आणि इतर साहित्य असा एकूण ३ कोटी २० लाख ८८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यात पोलिसांना यश जरी आले असले तरी या प्रकरणी कच्चा माल पुरवठादार आणि या एमडी ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या इतर साथीदारांकडे पोलिसांच्या तपासाची आता चक्रे फिरणार आहेत.
याअगोदर देखील तारापुर औद्योगिक क्षेत्रातील एका औषध कंपनी मध्ये घातक ड्रग्ज बनवत असल्याचे उघड झाल्या नंतर सदर कंपनी ही कायमस्वरूपी बंद करण्यात आली होती.प्रदुषण नियंञण मंडळ व औद्योगिक सुरक्षा विभाग अशा कारखान्यांना व्यवसायिक गुप्तांच्या नावाखाली हाजॉप स्टडी रिपोर्ट जो ख-या अर्थाने सार्वजनिक व लोक हितासाठी प्रसिद्ध करने गरजेचे आहे तो करित नसल्याने अमलिपदार्थ उत्पादन व देश विघातक कार्यात सक्रियता तारापुर औद्योगिक वसाहतीत व बोईसर भागात वाढत चालले आहे. त्यातच येथील कुचकामी असलेली सुरक्षा यंत्रणा त्यामुळे गुप्त माहिती देखील पोलिसांना भेटत नसल्याने इतर ठिकाणी असलेल्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आजवर पालघर जिल्ह्यातील अनेक बेकायदेशीर कामांवर धाडी मारून पर्दाफाश केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना आंदन देणारे जिल्हा पोलिस अधिक्षक यापुढे तरी घातक बेकायदेशीर अमली पदार्थ बनवणाऱ्या माफीयांवर नजर ठेवणार का हे पाहणे औचित्याचे ठरेल.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email