नाशिकरोड जेलमधील २२ स्थानिक कुख्यात कैद्यांना अन्यत्र हलविण्याच्या हालचाली

नाशिकरोड जेलमधील २२ स्थानिक कुख्यात कैद्यांना अन्यत्र हलविण्याच्या हालचाली
नाशिकरोड जेलमधील २२ स्थानिक कुख्यात कैद्यांना अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. न्यायालयापुढे तसा प्रस्ताव देण्यात आला असून, न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर या भाईंची रवानगी अन्य कारागृहात केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. पुढाऱ्यांच्या मदतीने जेलमधून सुटका करून घेण्याआधीच या गुंडांना अन्यत्र हलवून त्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत.

कारागृह प्रशासनाने कारागृहातील स्थानिक २२ कुख्यात भाईंची नावे कोर्टाला सादर केलेली आहेत. त्यातील दोघांना शिक्षा झाली आहे. उर्वरित वीस भाई सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाची हवा खात आहेत. राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेले हे भाई कारागृहात असूनही हस्तकांकरवी हप्तावसुली व गुंडगिरी करतात. कारागृहाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर या भाईंनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेलाही या भाईंमुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाने कोर्टासमोर स्थानिक गुन्हेगारांच्या स्थलांतराचा प्रस्ताव दिला आहे. त्याला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

इतर कैद्यांना संदेश

या माध्यमातून इतर कैद्यांनाही सुधारण्याचा संदेश प्रशासनाने दिला आहे. राजकीय वरदहस्त असलेले कैदी जेलमध्ये मनाप्रमाणे सोयी सुविधा मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेल प्रशासनाने दबाव झुगारुन त्यांना वठणीवर आणले आहे. शिक्षा भोगत असणारे स्थानिक कुख्यात कैदी आणि खटले सुरू असलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कच्चे कैदी इतर ठिकाणी स्थलांतरित केल्यास त्यांचे हस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. नांदेड, नागपूर, वर्धा, अमरावती, जालना सातारा, सांगली आदी ठिकाणी या आधी येथील कैद्यांना स्थलांतरित करण्यात आले होते.

गुन्हेगारीला आळा?

या कैद्यांना स्थलांतरित केल्यास शहरातील गुन्हेगारी आटोक्यात येईल. स्थानिक हप्ते वसुलीला आळा बसेल, असा कयास आहे. कारागृहात काही महिन्यांपूर्वी कैद्यांकडे मोबाइल सापडण्याचे प्रकार वाढले होते. तसेच कैद्यांच्या हाणामाऱ्याही होत होत्या. प्रशासनाने आपल्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करत काही कैद्यांना तळोजा व येरवडा कारागृहात हलविले होते. प्रशासनाच्या कठोर कारवाईमुळेच कैद्यांकडे मोबाइल सापडणे, हाणामारी, कैदी पलायन आदी घटनांना आळा बसलेला आहे.

..यांना हलविणार

जेलच्या सूत्रांनी सांगितले की, नाशिकरोड जेलमध्ये कुख्यात टिप्पर गँगचा समीर पठाण, राकेश कोष्टी, व्यंटकेश मोरे, गणेश चांगले, गण्या कावळे, कुंदन परदेशी, शाम महाजन या सराईत गुन्हेगारांसह खून, खंडणी प्रकरणाताली भाई आहेत. यातील बहुतेकांना राजकीय समर्थन मिळत असल्याने ते जेलचे नियम तोडू पाहत आहेत. त्यामुळे इतर कैद्यांवरही वचक राहत नाही. बेशिस्तीचे वातावरण तयार होते. म्हणून अशा भाईंना अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भाईंमुळे शहरातही गुन्हेगारी, हाणामारी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने शहर पोलिसांचीही त्यांना अन्यत्र हलविण्यास पाठिंबा
नाशिकरोड जेलमध्ये कच्च्या कैद्यांना कोर्टात ने-आण करण्यासाठी ७० पोलिस आहेत. जेलमध्ये ३३०० कैदी आहेत. सहा कैद्यांमागे एक सुरक्षा कर्मचारी असावा, असे शासनाचे पत्रक आहे. जेलमध्ये फक्त १९० कर्मचारी आहेत. त्यातच नामचीन गुंडांमुळे जेलची सुरक्षा, शिस्त धोक्यात आली असून, कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांना हलविण्याचा प्रस्ताव दिला आहे.

– राजकुमार साळी, कारागृह अधीक्षक

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email