नालेसफाईचा बोजवारा; अप्रिय घटना घडल्यास ठेकेदारासह जबाबदार अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांची मागणी
(म.विजय)
ठाणे – पावसाळा तोंडावर आलेला असतानाही ठाणे शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे यंदा पुन्हा ठाणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाण्यात पूरस्थिती निर्माण झाली आणि अप्रिय घटना घडून जर कोणी दगावल्यास संबधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकार्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली आहे.
पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ठाणे शहरामध्ये सुमारे 132 कि.मी. लांबीचे 13 मोठे व 30 छोटे नाले आहेत. नालेसफाईची कामे अनेक ठेकेदारांना देण्यात आले आहेत. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचे ठेके देण्यात आले आहेत. यंदा पावसाळा लवकर येणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे तेवढयाच तत्परतेने करण्याची गरज होती. मात्र, अद्यापही ठाणे शहरातील नाल्यांची सफाई पूर्ण झालेली नाही. शहराच्या अनेक भागातील नाले सफाई रखडलेली आहे. शिवाय, ज्या ठिकाणी नालेसफाई करण्यात आली आहे. त्याचा गाळ नाल्याच्या काठावरच ठेवण्यात आलेला असल्यामुळे हाच गाळ पुन्हा नाल्यात जाऊन पाणी तुंबण्याची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी अशाच पद्धतीने नाल्यांची सफाई केली होती. त्यामुळेच 29 ऑगस्ट 2017 रोजी ठाणे शहरात सुमारे 4 जणांचा हकनाक बळी गेला होता. कोरम मॉलजवळ तर आपल्या घराच्या दारातून एक मुलगी, एक महिला वाहून गेली होती. रामनगर येथे बचावकार्य करताना एक तरुण वाहून गेला होता. त्या शिवाय, कळवा, मुंब्रा, वागळे, वर्तकनगर आदी सर्वच भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. यंदाची नालेसफाई पाहता, अशाच घटना घडण्याच्या शक्यता अधिक आहेत. दरवर्षी ठाण्यातील नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही शहरातील नागरिकांची पाणी तुंबण्यापासून सुटका होत नाही. नालेसफाई करणार्या ठेकेदारांवर तसेच संबधित अधिकार्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने हे काम प्रामाणिकपणे करण्यात येत नाही. डोळ्यावर पांघरूण घेतलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्यांना या विषयाकडे पाहण्यास वेळ नसल्यानेच ठाणेकरांना पाण्यात रहावे लागत असते. किमान सन 2018 च्या पावसाळ्यात तरी ठाणेकरांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी आयुक्तांनी स्वत:हून लक्ष घालून नालेसफाईचे काम गांभीर्याने होईल, याची दक्षता घ्यावी; तसेच, जर पूरस्थिती निर्माण झाल्यास अन् त्यामध्ये कोणी दगावल्यास संबधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकार्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.