नाट्यवर्तुळातील एक वल्ली व्यक्तिमत्त्व म्हणजे अशोक मुळ्ये. स्पष्ट, परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध.

त्यांच्या बोलण्यातून कुणी दुखावले न जाता एखाद्याला ती जणू शाबासकीची थाप वाटावी. चिमटा जरी कुणाला काढला तरीही ती त्याला गुदगुली वाटावी. सदोदित पांढर्‍याशुभ्र कपड्यात वावरणारा व्हाइट मॅन, त्याच्या विविध कार्यक्रमांच्या हटके संकल्पनांसाठीही तेवढाच ओळखला जातो. नुकतेच मुळ्ये काकांनी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केलाय. वाढदिवसाच्या दिवशी टिपिकल हारतुरे, सत्कार करून घेण्यापेक्षा एका तरुणाला मावा सोडायला लावण्याचा चमत्कार केलाय मुळ्ये काकांनी.

अशोक मुळ्ये यांनी 20 ऑक्टोबर रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. यानिमित्त गिरगावात साहित्य संघ येथे शिवसेनेतर्फे त्यांचा मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार होता. तसेच फ्लेक्स, बॅनर्स लावण्यात येणार होते. काकांना 75 हजार रुपयांची थैली देण्यात येणार होती. मात्र मुळ्ये काकांनी हा सत्कार सोहळा करण्यास ठाम नकार दिला. मला अशा सत्कारात काडीचाही रस नाही, असे स्पष्टपणे सांगितले. शाखाप्रमुख बाळा अहिरेकर यांनी मुळ्ये काकांची खूप समजूत काढली. मात्र ऐकतील ते काका कुठले.

मग काका तुमच्यासाठी करू तरी काय, अहिरेकर यांनी सवाल केला. त्यावर काका पटकन म्हणाले, तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करायचंय ना, मग तुम्ही तोबरा भरून जो मावा खाता ना… तो सोडून द्या. तशी प्रतिज्ञा आजपासून करा. अहिरेकर यांनी स्वतःपासून सुरुवात करीत, काकांची इच्छा शिरसावंद्य मानून तत्काळ मावा न खाण्याचा निर्धार केला. याविषयी अहिरेकर म्हणाले, अधूनमधून मला मावा खाण्याची सवय आहे. पण मुळ्ये काकांसाठी यापुढे तो कधीही न खाण्याची प्रतिज्ञा केलीय. काकांनी खूप केलेय, नाट्यसेवेसाठी, समाजासाठी. त्यांच्यासाठी आम्ही एवढे निश्चितच करू शकतो.

अशोक मुळये गेली 40 वर्षे नाट्यव्यवस्थापनात कार्यरत आहेत. त्यांनी ‘सुयोग’ संस्थेसोबत 12 वर्षे काम केली.नाटकाच्या अनेक जाहिरातींमध्ये हटके कॅप्शन लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. माझा पुरस्कार आणि असेही एक साहित्य संमेलन हे त्यांचे आगळेवेगळे कार्यक्रम आहेत. गतिमंद मुलांच्या आईचे संमेलन आणि ज्येष्ठ रंगकर्मी संमेलन अशी संमेलनंही त्यांनी आयोजित केलेली आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email