नागपूरातील आमदार निवासात सापडला मृतदेह”

(म.विजय)

नागपूर दि.०३ – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची धावपळ सुरू असताना येथील आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विनोद अग्रवाल (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते आकोट येथील रहिवासी होते.

मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांची स्वीय सहाय्यक संदीप वरकडे यांच्यासोबत सोमवारी अग्रवाल नागपुरात आले होते. आमदार निवासातील ४६ क्रमांकाच्या खोलीत ते सोमवारी रात्री झोपायला गेले. आज सकाळी वरकडे तेथे गेले. तेव्हा त्यांना दाराची कडी आतमधून लावून असल्याचे लक्षात आले. त्यांनी बरेच आवाज देऊनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वरकडे यांनी बाजूला असलेल्या खिडकीतून जाऊन बघितले असता अग्रवाल अर्धे कॉटवर तर अर्धे खाली लोंबकळल्यासारखे पडून दिसले. त्यांनी लगेच आमदार निवास प्रशासनाला आणि पोलिसांना कळवले. त्यानुसार, सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. दाराला धक्का मारून आत प्रवेश केला असता अग्रवाल मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात पाठविले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविल्याचे पोलीस सांगतात.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे सर्वत्र धावपळ सुरू आहे. खासकरून आमदार निवासात वेगळीच लगबग दिसून येते. अशात ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email