नवी मुंबईचे पोलीस आयुक्त नागराळे निलंबित उपायुक्त तुषार दोषीही निलंबित
(म विजय)
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश देणारे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे आणि उपायुक्त तुषार दोषी यांना निलंबित करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मंगळवारी दिले.
विधान परिषदेच्या परवानगी न घेता शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्रक्रियेचे पालन केले नसल्यास निलंबित करावे, असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी दिले होते. याबाबतच्या इतिवृत्तात पोलीस आयुक्त नागराळे आणि उपायुक्त दोषी यांच्या नावाचा उल्लेख नसल्याची बाब जयंत पाटील यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अधिकार नसताना बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश या अधिकाऱ्यांनी दिले. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.
जयंत पाटील अध्यक्ष असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एका कर्जदाराकडून सहकार अधिनियमानुसार वसुलीची कार्यवाही सुरू केली. यावर कर्जदाराने बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि वसुली अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार केली. या प्रकरणाची शहानिशा न करता पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. सध्या राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. एखादया सदस्यांच्या विरोधात कारवाई करावयाची असल्यास विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापतीची परवानगी आवश्यक असते. किमान त्याची माहिती विधिमंडळाला देणे आवश्यक असते. मात्र नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी पररस्पर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सभापतींनी निलंबनाचे निर्देश दिले.
(sources -ABI News)