नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा म्हणजे प्रांजळ अनुभव कथन – डाॅ. सच्चिदानंद शेवडे
उदयन आचार्य लिखित नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा हे पुस्तक म्हणजे नर्मदा परिक्रमेवरील प्रांजळ आणि नितळ अनुभवकथन आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार आणि लेखक डाॅ. सच्चिदानंद शेवडे यांनी शनिवारी डोंबिवलीत केले.
मोरया प्रकाशन आणि शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मोरया प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
प्रसिद्ध अस्थिरोग शल्यविशारद डाॅ. जयंत गोखले हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. मोरया प्रकाशनाचे दिलीप महाजन यांच्यासह शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभेचे अॅड. हेमंत पाठक, मुकुंद पाठक, सुधीर बर्डे हे पदाधिकारीही व्यासपीठावर उपस्थित होते. डाॅ. शेवडे आणि डाॅ. गोखले यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कोणताही अभिनिवेश न बाळगता उदयन आचार्य यांनी हे पुस्तक लिहिले असल्याचे सांगून डाॅ. शेवडे म्हणाले हे पुस्तक वाचतांना वाचकांनाही प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा केल्याची अनुभूती नक्कीच येईल.
डाॅ. गोखले यांनी सांगितले, नर्मदा परिक्रमा केल्यामुळे आपल्या प्रत्येकाला जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी मिळते. आयुष्यात प्रत्येकाने किमान एकदा तरी जमेल तशी नर्मदा परिक्रमा करावी. तर लेखक उदयन आचार्य यांनी आपल्या मनोगतात नर्मदा परिक्रमेतील काही अनुभव सांगून नर्मदेचा ध्यास कसा लागला याची माहिती दिली. कार्यक्रमास डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.