नया रायपूर स्मार्ट सिटीच्या एकीकृत नियंत्रण केंद्राचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली,दि. १४ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नया रायपूर स्मार्ट सिटीच्या एकीकृत नियंत्रण केंद्राचे उद्घाटन केले. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीप पुरी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यावेळी उपस्थित होते. नया रायपूरचे एकीकृत नियंत्रण केंद्र हे देशातले कार्यान्वित होणारे दहावे स्मार्ट सिटी केंद्र ठरले आहे. अहमदाबाद, वडोदरा, सुरत, पुणे, नागपूर, राजकोट, विशाखापट्टणम्, भोपाळ आणि काकीनाडा या नऊ शहरातील एकीकृत नियंत्रण केंद्रे याआधीच कार्यान्वित झाली आहेत
स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत निवड झालेले नया रायपूर ही छत्तीसगडमधील तिसरी स्मार्ट सिटी आहे. नया रायपूर ही देशातली पहिली स्मार्ट ग्रीनफिल्ड सिटीही आहे. देशातली डिजिटली ॲसेसेबल पहिली स्मार्ट सिटी ठरण्याचा मानही नया रायपूरकडे जात आहे. नया रायपूर माहिती तंत्रज्ञान, वित्त, व्यापार, वैद्यकीय, शिक्षण यासारख्या क्षेत्रात सेवा पुरवणारे केंद्र ठरावे अशा दिशेने काम सुरु आहे.
नया रायपूरच्या एकीकृत नियंत्रण केंद्राच्या उद्घाटनामुळे विविध यंत्रणा एकीकृत करुन सार्वजनिक सेवा आणखी उत्तम करण्याबरोबरच सुरक्षितताही वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी एक खिडकी, शहर प्रशासनात उत्तरदायित्व आणणे यासह इतर उपाय योजनांचा यात समावेश आहे.