धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकी डोक्यावर पडून तरुणी जखमी
पालिका प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
(श्रीराम कांदु)
डोंबिवली :- दि. १५ – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील अतिधोकादायक आणि धोकादायक आणि इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या इमारती जमीनदोस्त करण्यासाठी एकीकडे पालिका प्रशासन इमारत मालकांना नोटीस देऊन शांततेची भूमिका बजावीत आहे. तर दुसरीकडे इमारत मालक मात्र इमारत जमीनदोस्त करण्यास कानाडोळा करताना दिसतात. त्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात असल्याचे दिसून येते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील विश्वदीप इमारत क्र.१ ही इमारत पालिकेने अतिधोकादायक जाहीर केली आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकी एका तरुणीच्या डोक्यावर पडल्याने जबर जखमी झाली.
आकांक्षा पोस्टे असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून ती दावडी गावात राहते.आपल्या मैत्रिणीसोबत जात असताना तिच्या डोक्यावर सदर इमारतीची खिडकी पडल्याने तिच्या मैत्रिणीने तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.या इमारतीचे मालक प्रफुल्ल वाघाडकर यांना पालिका प्रशासनाने ३० मे रोजी सदर इमारत जमीनदोस्त करावी अशी नोटीस बजावली होती. मात्र इमारत मालकाने अद्याप सदर इमारत जमीनदोस्त केली नाही.याबाबत इमारत मालक वाघाडकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सदर इमारत जमीदोस्त करण्यास पालिकेला कळविले होते असे सांगितले.दरम्यान या इमारत स्टेशनजवळ असल्याने नेहमीच नागरिकांची वर्दळ सुरु असते. त्यामुळे ही इमारती किती जणांना जखमी करेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी
डोंबिवली शहरात अनेक इमारती अतिधोकादायक आणि धोकादायक झाल्या आहेत. पालिका प्रशासन मात्र अश्या इमारतीच्या मालकांना इमारत जमीनदोस्त करण्याची नोटीस बजावते. दुदैवाने अश्या इमारतीचा एखादा भाग कोसळला आणि कोणी जखमी झाल्यानंतर पालिका तात्काळ या इमारतीवर कारवाई करतात. परंतु नोटीसा बजाविल्यानंतर याची अमलबजावणी होत आहे कि नाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची ओरड शहरात सुरु असून अश्या इमारती जमीनदोस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.