धरगुती गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम स्थानिक गुंडांनी बंद पाडल्याने ठप्प
(श्रीराम कांदु)
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मतदार संघातील नागरिकांना घरगुती गॅस पुरवठा व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत असताना कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका ते चक्की नाका व डोंबिवलीतील आजदे जिमखाना रोड येथे महानगर कंपनीचे घरगुती पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु असून आर्थिक मागणी करत स्थानिक गुंडांनी ते कामच बंद पाडल्याने हे कामच ठप्प झाले आहे.
महानगर गॅस कंपनीने गोळवली ग्रमपंचायत असताना ग्रामपंचायतीला रस्ते खोदून पुन्हा निट करण्यासाठी सुमारे 15 लाख रुपये दिले होते तर कल्याण डोंबिवलीतील काम झाल्यावर रस्ते खोदल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेकडे सुमारे 1 केाटी 27 लाख रुपये जमा केले आहेत. मात्र ही कामे बंद असल्याने कल्याण शिळ रोडवरील देशमुख होम्स येथील भागात पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यासाठी ती अनामत रक्कम वळती करावी असे पत्र कंपनीने महापालिकेला पाठवले आहे. कल्याण व डोंबिवलीत पाईप लाईन टाकण्याचे काम करणारे ठेकेदार गुंडांच्या त्रासाने त्रस्त असून ठरवून दिलेल्या वेळेत काम कसे पूर्ण होणार असा प्रश्न त्याना पडला आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या महितीनुसार डोंबिवलीत सुमारे 11 कि.मी. लांबीचे काम करायचे असून सुमारे 50 ते 60 हजार ग्रहकांना गॅस पुरवठा करण्यात येणार असून आतापर्यत अवघे १५०० ग्रहकांना गॅस पुरवठा करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.