ट्रेन प्रवासादरम्यान सहप्रवाशांना सिगारेट पिण्यास रोखल्याने महिलेची हत्या
ट्रेन प्रवासादरम्यान सहप्रवाशांना सिगारेट पिण्यास रोखल्याने तीन तरुणांनी एका महिलेसह तिच्या मुलाला व सुनेला बेदम मारहाण केली. यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जालियानवाला बाग एक्सप्रेसमध्ये घडली आहे. चिंता देवी (50) असे तिचे नाव आहे. छठ पूजा करण्यासाठी चिंता देवी सून व मुलाबरोबर बिहारला जात होत्या. दरम्यान मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी साखळी खेचत ट्रेन थांबवली व तिथून पळ काढला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली.
चिंता देवी बिहारमधील डेहरी आनसोन येथील डालमियानगरमधील मखरिन या गावात राहतात. तर त्यांचा मुलगा पंजाबमधील जालंधर येथे नोकरी करतो. चिंता देवी काही दिवसांसाठी मुलाकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. छठ पूजा असल्याने मुलगा व सुनेला घेऊन त्या ट्रेनमधून पंजाबहून बिहारला जात होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या वरच्या सीटवर तीन तरुण सिगारेट पीत होते. धूराचा त्रास होत असल्याने चिंता देवीने त्या तरुणांना सिगारेट न पिण्यास सांगितले. पण यावर तरुणांनी चिंता देवीची टर उडवण्यास सुरुवात केली.
यामुळे चिंता देवीच्या मुलाला राहुलला राग आला व त्याने तरुणांना शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर तरुणांनी राहुलला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी चिंता देवी राहुलच्या बचावासाठी पुढे आल्या. यामुळे चिडलेल्या तरुणांनी चिंता देवी व त्यांच्या सुनेसही मारहाण करण्यास सुरूवात केली. यात चिंता देवींना जबर मार लागला व त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर तरुणांनी साखळी खेचून ट्रेन थांबवली व ते पळून जाऊ लागले. यादरम्यान त्यातील एकाला इतर प्रवाशांनी पकडले. त्यानंतर लोकोपायलटला याबदद्ल कळाले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी शाहजहापूर येथील रुग्णालयात चिंता देवी यांना दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.