दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन संशयितांना अटक

नाशिक – दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इनच्या मागे सापळा रचून अटक केली़ या दोघांकडून दोन गावठी कट्टे, दहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत़

पाथर्डी फाटा परिसरात गावठी कट्टे विक्रीसाठी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील संशयित येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कर्मचारी शांताराम महाले यांना मिळाली होती़ त्यानुसार शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास हॉटेल एक्सप्रेस इनच्या पाठिमागील परिसरात सापळा लावण्यात आला होता़ संशयित निगेहबान इम्तियाज खान (४१, ओमकार रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर ५०३, बी़ विंग, टिटवाळा स्टेशन) व रणजित गोविंदराम मोरे (३२, रा़२०५, सी विंग, हरिविश्व सोसायटी, पाथर्डीफाटा, एक्स्प्रेस इनच्या पाठिमागे) हे दोघे संशयास्पदरित्या आढळून आले़

पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित निगेहबान खान याने रणजित मोरे यास दोन गावठी कट्टे व काडतुसे विक्रीसाठी आल्याची कबुली दिली़ या दोघांकडील दोन गावठी कट्टे तसेच दहा जिवंत काडतुसे असा ६१ हजार ३०० रुपयांचा ऐवज पोलिसानी जप्त केला़ या दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

गावठी कट्टे विक्री

शहरात गावठी कट्टे विक्रीचे रॅकेट कार्यरत असलयाची शक्यता पोलीस अधिका-यांनी व्यक्त केली आहे़ शहरातील विविध पोलीस ठाणे, गुन्हे शाखा युनिट एक व दोन यांनी आतापर्यंत २२ गावठी कट्टे व ५० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ विशेष म्हणजे शस्त्र बाळगणा-यांमध्ये राजकीय नेत्याचा मुलाचाही समावेश आहे़  

गावठी कट्टे परराज्यातून

 शहरात येणारे गावठी कट्टे हे परराज्यातून येत असल्याचे समोर आले आहे़ यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून कट्टे विक्रीतील काही संशयितांनी नावे समोर आली असून त्यांच्या माहितीवरून या रॅकेटच्या मुळापर्यंत जाणार आहोत़.असे पोलिसांचे म्हणणेे आहे. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email