दूषित पाणी आढळणाऱ्या उपहारगृहाचे परवाने होणार रद्द
पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या स्त्रोतांचे जैविक तपासणी करा – मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार
ठाणे – पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नये याकरिता सार्वजनिक , खाजगी आणि इतर पाणी स्त्रोतांच्या पाण्याचे जैविक तपासणी करण्याचे आदेश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी मंगळवारी झालेल्या पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावत असल्याने पावसाळ्यापूर्वीच योग्य ती खबरदारी म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तीव्र जोखीम असणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतांची आठवड्यातून एकदा तर मध्यम जोखीम असणाऱ्या स्त्रोतांची महिन्यातूनएकदा जैविक तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत हॉटेल , ढाबे आणि उपहारगृहा आदी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणी देखिल पाण्याची तपासणी केली जावी असे त्यांनी सांगितले. या तपासणी दरम्यान खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणी दूषितपाणी आढळून आल्यास विक्रीकराचे परवाने रद्द करावेत अशा स्वरुपाचे आदेश देखिल भीमनवार यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.
ग्रामपंचायत हद्दीतील गृहसंकुलात पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करून पाणी साठवून करणाऱ्या टाकीमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केले जावे असेही ते म्हणाले. या कामासाठी जिल्हास्तरावर जून ते ऑगस्ट कालावधीत कमिटी स्थापन करण्यात येणार असून त्याचे नियंत्रक म्हणून उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) काम पाहणार आहेत. या बैठकी दरम्यान उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) मानसी बोरकर उपस्थित होत्या.