तुम्हाला कोण व्हायचंय ? मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर की “डोंबिवलीकर” ?

तुम्हाला कोण व्हायचंय ? मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर की “डोंबिवलीकर” ?

कै. पु.ल.देशपांडे यांची क्षमा मागून …..

(आशीर्वाद बोंद्रे यांचा लेख. त्यांच्या फेसबुक पानावरुन साभार)

आता तुम्हाला डोंबिवलीकर व्हायचंय का ? तर तुमची ही महत्वाकांक्षा प्रत्यक्षात येणं म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर सोपी आहे. म्हणजे तुम्ही मुंबई किंवा ठाणे किंवा अगदी जळगाव किंवा पश्चिम महाराष्ट्रात जरी राहत असलात तरी डोंबिवलीत तुम्ही घर नक्की घेऊ शकता. म्हणजे कागदोपत्री डोंबिवलीकर होणं फारसं कठीण नाही. पण तुम्हाला अस्सल डोंबिवलीकर व्हायचं असेल तर मग तुम्हाला डोंबिवलीत वास्तव्याला यावं लागेल. त्यातही तुम्ही बालपणापासून डोंबिवलीत वास्तव्याला असाल तर तुमचा महत्वाचा राहण्याचा प्रश्न सुटला. आणि एकदा तुम्ही बालपणापासून डोंबिवलीत राहायला लागलात की थोड्याफार प्रयत्नांनी तुम्ही डोंबवलीकर होतच जाता. म्हणजे तुम्हाला अन्य काही होताच येत नाही.
डोंबिवलीकरांमध्येही दोन प्रकार आहेत. एक ” जाज्वल्य डोंबिवलीकर .” आणि दुसरा म्हणजे ” नावाचा डोंबिवलीकर.”
” नावाचा डोंबिवलीकर” होण्यासाठी तुमचं रेशनकार्डचा पत्ता बदलला तरी पुरेसं असतं.
पण जाज्वल्य डोंबिवलीकर होण्यासाठी तुम्हाला जरा मेहनत करावी लागेल. त्याकरता पूर्वअट आहे. तुमचं वय जर चाळीशीच्या पुढे असेल तर तुमची पूर्वअट म्हणजे तुमचं शिक्षण हे जोशी हायस्कुल किंवा टिळकनगर किंवा गेला बाजार विवेकानंद दत्तनगर अथवा राणाप्रताप मध्ये झालेलं असलं पाहिजे.
दुसरी अट म्हणजे तुम्हाला डोंबिवलीचा साधासुधा नाही तर जाज्वल्य अभिमान पाहिजे. म्हणजे कसं की आपल्या मनात हे घट्ट नोंदवून ठेवलेलं असलं पाहिजे की संपूर्ण भरतवर्षामध्ये जी काही बौद्धिक संपदा आहे ती केवळ डोंबिवलीत आहे. म्हणजे आपल्या नोकरीच्या ठिकाणी आणि अन्यत्र आपल्या नातेवाईकांसमोर बढाया मारताना हे धोरण उपयोगी पडतं.
डोंबिवलीकर होण्यासाठी आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते. ती म्हणजे कोणत्याही विषयावर आपल्याला ठाम मतप्रदर्शन करता यायला पाहिजे. म्हणजे ” कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदो यांची भारतभेट यशस्वी की अयशस्वी? ” या विषयावर , आपण मुंबईत लोअर परळला एक खाजगी कंपनीत assistant clerk आहोत हे विसरून, समोरच्याला कंटाळा येईपर्यंत, बोलता आलं पाहिजे.
खास डोंबिवलीकरांसाठी आवश्यक आणखी एक criteria म्हणजे रेल्वेचं सकाळ आणि संध्याकाळचं जवळजवळ संपूर्ण वेळापत्रक पाठ असायला हवं. रेल्वेचा विषय निघाला की १२ डब्बा, १५ डब्बा , ७-१६ डबलफास्ट , ८-३४ दादर या, सर्वसामान्य माणसाला अगम्य वाटणाऱ्या, सांकेतिक भाषेत बोलता यायला हवं.
रेल्वेचा डबा हे केवळ प्रवासाचे साधन नसून भजनं गाण्याचं, पत्ते कुटण्याचं आणि, महिला असल्यास, हळदी कुंकू समारंभापासून ते डोहाळेजेवणपर्यंत विविध सांस्कृतिक, धार्मिक, कौटुंबिक कार्यक्रम साजरं करण्याचं हक्काचं सभागृह आहे ही समजूत स्पष्ट असावी.
डोंबिवलीबाहेरच्या लोकांच्या दृष्टीने डोंबिवली स्टेशनवरून लोकल गाडी पकडणं हे पेंटागॉनची सुरक्षा भेदण्याइतकं कठीण काम असलं, तरी आपल्याला मात्र आपल्याला हवी ती लोकल बरोब्बर पकडता यायला हवी. इथे रोजचा सराव उपयोगी ठरतो. त्यासाठी आपल्या रोजच्या लोकलमध्ये आपला ” गृप” असणं महत्वाचं आहे. म्हणजे बाकीच्या चढणा-यांना आडकाठी करून स्वतःला आत चढता येईल.
तुम्ही अस्सल डोंबिवलीकर झालात किंवा नाही याची परीक्षा म्हणजे डोंबिवलीला फास्ट लोकल पकडून तुम्हाला ठाण्याला दुसऱ्या बाजूने उतरता यायला हवं. इतरांच्या दृष्टीने हे ” धरमतर ते गेट वे ” पोहून जाण्याइतक कठीण असलं तरी आपल्याला इमारतीसमोरचा फूटपाथ ओलांडावा इतक्या सहज जमलं पाहिजे.
” डोंबिवलीकर होणे ” याला एक सांस्कृतिक पैलूही आहे. म्हणजे डोंबिवलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचं जे बारमाही पीक आलेलं असतं, त्यात आपला सहभाग असायला हवा. म्हणजे सुरवातीला कार्यक्रम बघायला जाणे या पासून पुढे पुढे आयोजनात काहीतरी फुटकळ सहभाग घ्यायला हवा.
सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावताना मधेच प्लास्टिक गोळा करणे, कचरा विघटनाच्या कार्यशाळेला जाणे, आपल्या भागात पाणी पुरवठा एक दिवसाआड होत असला आणि रोज अडीच तास अघोषित load shading असलं, तरी उगाचच ” smart city vision document ‘ असल्या बिनउपयोगाच्या परिसंवादाना हजेरी लावावी व वक्त्यांना उगाचच प्रश्न विचारून आपली दखल घ्यायला भाग पडावं.
आपल्या स्वतःच्या १३ जणांच्या सोसायटीत आपल्याला कोणी विचारत नसलं तरी गणेश मंदिर संस्थान किंवा डोंबिवली बँकेच्या निवडणुकांमध्ये मात्र आपण आपली मतं निर्भीडपणे मांडावीत. फक्त नगरपालिका निवडणुकांमध्ये मात्र शेपूट घालून निमूट बसावं नाहीतर ” स्थानिकांशी” वैर महागात पडू शकते.
आपल्या मुलांना आवर्जून CBSC अभ्यासक्रमाच्या इंग्रजी शाळेत प्रवेश घ्यावा व शेजारच्या मारवाड्याने गुजराती किंवा इंग्रजीत दुकानाचा बोर्ड लावला , की त्याबद्दल पान पान भर पोस्ट whatsap, फेसबुकवर लिहाव्यात.

” डोंबिवलीत रस्त्यांवर भरपूर खड्डे आहेत ” याबद्दल अन्य लोकच जास्त बाऊ करतात. कारण अस्सल डोंबिवलीकर कधी चुकूनही हेल्मेट वगैरे घालून स्कुटर चालवत नाही. हेल्मेट घालणं, वळताना स्कुटरचा indicator दाखवणं म्हणजे भ्याडपणाचं लक्षण आहे. हेल्मेट घालून मोटारसायकल चालवणारा हा भोपळे बांधून पोहणार्या इतकाच बावळट समजला जातो.
तुम्ही जर कॉलेज विद्यार्थी असाल तर किमान तिघांच्या संख्येनी , एकाच मोटारसायकलवरून, आजूबाजूच्या चालत्याबोलत्या प्रेक्षणीय स्थळांकडे बघत मोटारसायकल चालवता यायला हवी. अन्यथा लायसन कॅन्सल होतं असं म्हणतात.
तुम्ही नुकतंच तारुण्यात पदार्पण केलं असेल तर डोंबिवली सारखं शहर नाही ! चारीबाजूला नुसती सळसळती हिरवळ, रंगीबेरंगी फुलपाखरं . तुम्हाला फक्त तुमच्या क्लासच्या आणि कॉलेजच्या वेळा ऍडजस्ट करता यायला हव्यात.
तुम्ही college going असाल आणि गुढी पाडव्याला आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही फडके रोड , गणेश मंदिर परिसरात पारंपरिक पोशाख घालून गेला नाहीत तर तो foul धरला जातो.
आजकाल,डोंबिवलीकर होण्याला काही नवे आयाम जोडलेत. म्हणजे तुम्ही तिशीपस्तिशीचे असाल तर तुम्हाला I T मध्ये काम करणं बंधनकारक आहे. म्हणजे करत नसाल तरी सांगताना तसंच सांगावं. अन्यथा down market समजलं जातं. तरुणांचा तर break up ही होऊ शकतो.
तसंच, whatsapp, facebook वगैरे सोशल मीडियावर कायम चोवीस तास online असणं गरजेचं आहे. हे नव – डोंबिवलीकरांनी नीट ध्यानात घ्यावं.
सोशल मीडियावर कायम कोणत्याही विषयावर मनाला येईल ती कॉमेंट करता येणं हा अनिवार्य भाग मानला जातो. किमान पंचवीस गृपवर आपला वावर असावा अशी नवीन पूर्वअट ठेवण्यात आली आहे. ‘ सोशल मीडियावर active राहायला काहीतरी कारण असायला लागतं ‘ ही समजूत मनातून काढून टाकावी. दिवसभर good morning पासून रात्री सुमारे दीड वाजता मैत्रिणीला GNSD करण्याची अचाट क्षमता विकसित करायला हवी.
साधारणपणे दर आठवड्यातून एकदा डोंबिवलीतील समस्यांबद्दल सखोल/ चिंतनात्मक अथवा पोटतिडकीने अथवा sarcastically लिहिता यायला पाहिजे. राजकीय घडामोडीवर तात्काळ प्रतिक्रिया देणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे , तो कोणालाही हिरावून घेऊ देऊ नये. अशी प्रतिक्रिया देताना कोणाला आपण दुखावू वगैरे विचार करायची आवश्यकता नाही. फक्त स्थानिक बाहुबलींच्या विषयी लिहिताना जरा सांभाळून , नाहीतर ” मांडवली ” करताना नाकी नऊ यायचे. अन्यथा, पंतप्रधानांपासून ते राष्ट्रपतींपर्यंत आणि सरसंघचालकांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत कोणाबद्दलही काही ही , निरार्गल लिहिता यायला हवं.
आपल्या निर्भीडपणाचे, सडेतोडपणाचे, निस्पृहतेचे दाखले समोरच्याच्या तोंडावर मारता आले पाहिजेत. आणि हे सगळं करताना आपण स्वतः मात्र gr + 4 च्या अनधिकृत इमारतीमध्ये वडिलांनी घेतलेल्या फ्लॅट मध्ये राहतो आहोत हे विसरून जावं.
कचऱ्याच्या कुंडीबाहेर आपण स्वतः जरी रोज कचरा भिरकावत असलो , तरी सोशल मीडिया वर महानगरपालिकेच्या विरोधात रणशिंग फुंकावं.
आपण स्वतः सापासारखी नागमोडी मोटारसायकल चालवत असलो तरी ” RTO वाले पैसे खातात” म्हणून गळा काढावा.
घराजवळच्या मैदानात ढोल पथकवाले सराव करत असले की रात्री दहा वाजून एक मिनिटांनी आरडाओरडा करून सराव थांबवला की तुम्ही खरे डोंबिवलीकर. त्यावेळी सोयीस्कररित्या हे विसरून जायचं की गेल्याच आठवड्यात मागच्या गल्लीत, ” हळदी ” चा कार्यक्रम होता, तेव्हा आपण शहामृगाप्रमाणे उशीत डोकं खुपसून रात्रभर D J ऐकत होतो.
” या फेरीवाल्यांमुळे चालायला जागा उरली नाही. KDMC, नगरसेवक आणि फेरीवाले यांचे लागेबांधे आहेत ,” असं करवदताना, आताच ऑफिसमधून घरी येताना आपण स्टेशनवरच्या फेरीवल्या भैय्याकडून केळी विकत घेतली आहेत हे लक्षात ठेवायची गरज नाही.
कुठल्याही निवडणुका आल्या की सत्ताधारी पक्षावर झोड उठवावी. “आता बदल व्हायलाच हवा,” अशी राणा भीमदेवी गर्जना करून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी , रविवारला जोडून सुट्टी आल्याने, आपण हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगला जावे व दुसऱ्यादिवशी फेसबुकवर फोटोचा मारा करावा. परत, नव्याने निवडून आलेल्या जुन्या लोकप्रतिनिधींचं अभिनंदन सोशल मीडियावर करायला तयार !
अशा डोंबिवलीकर होण्याच्या प्रथमा, द्वितीया अशा परीक्षा दिल्या की महत्वाची पायरी म्हणजे शहरात कार्यरत असलेल्या असंख्य संस्था/ संघटना/ गृप/ क्लब यापैकी कुठेतरी कार्यकारी मंडळावर जायची धडपड चालू ठेवायची. अश्या कुठच्याही छूटपुट संस्थेच्या कार्यकारिणीत समावेश झाला की तुम्ही खऱ्या अर्थाने ” जाज्वल्य डोंबिवलीकर” होऊ लागता.

——— असो . आम्ही कै. पु. ल. देशपांड्यांच्या ” तुम्हाला कोण व्हायचंय ? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर. ” या लेखाचा पुढच्या भागातील काही अंश तुम्हाला दाखवला. पूर्ण लेख तयार आहे. प्रकाशक मिळाले की प्रकाशित करण्यात येईल.
—– आशीर्वाद बोंद्रे
(एक जाज्वल्य डोंबिवलीकर)

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email