तीन केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाल्याने वाढला उत्साह ,उर्वरित ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रेही टाकणार कात
ठाणे – ठाणे जिल्ह्यातील सर्व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारून त्यांना राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळावे म्हणून नाविन्यपूर्ण योजनेतून नुकतेच सुमारे ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढावा यासाठी नियोजनबध्द प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या होत्या. या ३३ मधील धसई, दाभाड आणि दिवांजूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना कालच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानांकन (एनक्युएएस) मिळाले त्याबद्धलही पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे विशेष अभिनंदन केले आहे.विशेषत: या केंद्रांमध्ये बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, प्रसूतिगृह, प्रयोगशाळा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे, आस्थापना विषयक बाबी, आरोग्य सेवांचा दर्जा वाढविणे यावर भर देण्यात येणार आहेठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील दाभाड आणि दिवेअंजूर तर, मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रांनी राष्ट्रीय गुणवत्ता अॅश्युरन्स पुरस्कारासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मागील वर्षी राष्ट्रीय स्तरावरून एक पथक या प्राथमिक आरोग्य केंद्रांची पहाणी करण्यासाठी आले होते. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात येणार्या रुग्णांना देण्यात येणार्या सेवा, रुग्णालयातील सुविधा, तसेच रुग्णालयातील शिपाई ते वैद्यकीय अधिकारी यांच्या कामाची पध्दती यांची प्रत्यक्ष पहाणी करण्यात आली होती.उर्वरित ३१ ही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देखील गुणात्मक बदल घडावा व असे मानांकन याही केंद्रांना मिळावे यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी दिला असून आणखीही मदत आरोग्य विभागाला करण्यात येईल असे डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्याशीही त्यांनी चर्चा केली असून आरोग्य केंद्रांमध्ये मुलभूत परिवर्तन करण्यासाठी नियोजन तयार करण्यात येत आहे.