तहानलेल्या गावांना शासनाकडून निधी नाहीच, स्वनिधीतून झेडपीचा पाणी पुरवठा सुरू

(म.विजय)

शहापूर -धरणांचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या शहापूर तालुक्यात गेल्या वर्षी रेकॉर्डब्रेक पर्जन्यवृष्टी झाली. तरीही यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या वर्षीच्या पाणी टंचाई आराखड्यामध्ये ५५ लाख रूपये निधी मंजूर करण्यात आला होता. तर यंदाच्या आराखड्यामध्ये तब्बल ९० लाख रुपये निधी टंचाईग्रस्त गावांना अपेक्षित आहे. मात्र अजून एकही रुपया शासनाकडून निधी मिळाला नसल्याने जिल्हा परिषदेला स्वनिधीतून टंचाईग्रस्त गावांची तहान भागवावी लागत आहे.

      शहापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक गावपाडे खडकाळ भागात असल्याने त्याठिकाणी पाण्याचा उद्भव नाही. भुगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तालुका कृषी आणि वनविभागाकडून नदीनाल्यांना बंधारे बांधणे आवश्यक आहे. तालुक्यातील कसारा, वेळुक, दहिगाव, टेंभा, वाशाळा, ढाकणे, फुगाळे, कोथळे, या भागात पाण्याचा उद्भव नसल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यंदाच्या वर्षी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तत्काळ निधी मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नुकताच पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार शासनाकडुन लवकरात लवकर सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा जिल्हा परिषद पाणीपुरवठा कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे. 

तर शासनाकडून वेळेत निधी मिळत नसल्याने तालुक्यातील टंचाईवर मात करण्यासाठी शहापूर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडुन १७ ते १८ टँकर प्राप्त झाले आहे. मात्र मे अखेरपर्यंत प्राधान्याने २३ टँकरची आवश्यकता आहे. तर १२२ गावपाड्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणीपुरवठा करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र तलवाडा, अघई, आपटे, कळमगाव, आवरे या ग्रामपंचायतींना अजुनही मंजुरी मिळालेली नाही. तर आवाळे, रानविहीर, वांद्रे या ग्रामपंचायती प्रस्तावित असल्याचेही समोर आले आहे. 

        २००६ सालापासून आतापर्यंत शहापूर तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दोनशेच्यावर पाणी योजना जाहीर केल्या, काही ठिकाणी कामे सुरू आहे. तर काही ठिकाणी अर्धवट असल्याने या योजना कागदावरच दिसून येत आहे. शहापूर तालुक्यातील १७ गावे आणि ५७ पाड्यांना टँकरव्दारे आजमितीस पाणी पुरवठा सुरू आहे. १८ गावे आणि ३७ पाड्यांना एकूण ५५ हातपंप मंजुर करण्यात आले. तर कृती आराखड्यामध्ये हातपंपासाठी ३३ लाखांची तरतुद करण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली. 

टँकर ठेकेदारांची परवड

       प्रति टँकर इंधन खर्चासाठी महिन्याकाठी ४५ हजार रूपये जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुर केले आहेत. पेट्रोलपंप मालकांनी २ लाख रूपयांचे आतच इंधन उसनवारीवर देण्यात येईल, अशी अट घातल्याने मोठ्या प्रमाणात पंचाईत झाली आहे. यामुळे टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची परवड होत असल्याची बाब समोर आली आहे.

          याबाबत शहापूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता आर. एम. आडे यांच्याशी संपर्क साधला असता. उन्हाळ्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. परंतू शासनाकडून अद्यापपर्यंत एकही रुपया निधी प्राप्त झाला नसल्याने जिल्हा परिषद स्वतःचा निधी वापरत आहे. शासनाकडून निधी येतो मात्र उशिराने येत असल्याने थोडीफार समस्या निर्माण होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email