तळोजातील तुरुंग अधिकार्यावर गोळीबार प्रकरणी दोघांना सक्तमजुरी
पनवेल – तळोजा मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकार्यावर गोळीबार करुन त्यांच्या हत्येचा प्रयत्न करणार्या २ आरोपींना १० सश्रम कारावासाची शिक्षा सुणावण्यात आली आहे. प्रज्योत बळीराम पाटील (२९,रा.केळवणे, पनवेल) आणि संग्राम शरद खोपडे (२८,रा.नाझरे, ता.भोर) अशी त्या दोघां आरोपींची नावे आहेत. अलिबाग येथील विशेष मोक्का न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
तळोजा मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदी असताना, विक्रांत दत्तात्रेय देशमुख, सचिन सर्जेराव गर्जे व महेश सुनील शेट्ये यांच्यापैकी सचिन आणि महेश यांनी ३ सप्टेंबर २०१२ ला कारागृहातील बॅरेकमध्ये इतर न्यायबंदींसोबत भांडण केले होते. त्यावेळी तुरुंगाधिकारी भास्कर नथू कचरे यांनी त्यांच्यावर सौम्य बळाचा वापर करुन त्यांचे भांडण मिटवले होते. तसेच पुन्हा भांडण होऊ नये म्हणून त्यांचे बॅरेक बदलण्यात आले होते. या प्रकरणाचा राग धरुन विक्रांत, सचिन व महेश यांनी प्रज्योत बळीराम पाटील, संग्राम शरद खोपडे, रुपेश सुभाष शिंदे (२९,रा.पनवेल), राजेश राजाराम कैकाडी (३४,रा.पनवेल) यांच्या मदतीने तुरुंगाधिकारी भास्कर कचरे यांच्या हत्येचा कट रचला. ९ सप्टेंबर २०१२ ला कचरे त्यांचा मित्र हे मोटार गाडीने पनवेल येथे जात असताना प्रज्योत व संग्राम हे दोघे मोटारसायकलवरुन आले आणि त्यांच्यावर पिस्तुलाने गोळी झाडून पसार झाले.
हा प्रकार हा पापडीचा पाडा गावाजवळ घडला होता. जखमी अवस्थेत कचरे यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे खारघर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला व भादंवि कलम ३०७ सह ३४ भारतीय हत्यार या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे या गुन्हयाचा मोक्का अंतर्गत तपास करण्यात आला. त्यानंतर प्रज्योत पाटील, संग्राम खोपडे, रुपेश शिंदे, राजेश कैकाडी, विक्रांत देशमुख, सचिन गर्जे व महेश शेट्ये यांच्याविरुद्ध खारघर पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम ३,२५,२७ व मोक्का कायदा अन्वये तपास पूर्ण करुन विषेश मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला विषेश मोक्का न्यायाधीश के.आर. पेठकर यांच्या न्यायालयात चालला.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष शासकीय अभियोक्ता (मोक्का) अॅड.प्रसाद पाटील यांनी एकूण ४६ साक्षीदार तपासले. सुनावणीअंती प्रज्योत पाटील व संग्राम खोपडे यांना दोषी धरुन १० वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच आरोपी प्रज्योत पाटील याला भारतीय हत्यार कायदा कलम २७ अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावली. उर्वरीत आरोपींची पुराव्यांअभावी मुक्तता करण्यात आली.सदर गुन्हयाचा तपास खारघर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलस निरीक्षक किरण पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप माने यांनी केला.