तब्बल २५ वर्ष एका बाळासाठी आसुसलेल्या बापाच्या पदरात पडले तिळे !
परळी- लग्नाला २५ वर्षे झालेली, मात्र एकही अपत्य नाही.. वर्षानुवर्षे ‘तो’ बाप अपत्य प्राप्तीसाठी आसुसलेला. त्याने जिथे अपत्याचं दान मागितलं नाही असा एकही देव्हारा नाही, किंवा इलाज केला नाही असा एकही दवाखाना नाही.. परंतु सर्व काही व्यर्थ ठरले. मात्र, अचानक २५ वर्षानंतर घरातील पाळणा हलला.. आणि निसर्गाची किमया तर पहा.. वयाच्या पन्नाशीत पोचलेल्या बापाच्या पदरात एक नाही, दोन नाही तब्बल तीन अपत्ये एकदाच पडली !! एका मुलाचा किलबिलाट ऐकण्यासाठी आसुसलेला त्या बापाचे घर एकदाच तीन-तीन बालकांच्या आवाजाने भरून गेलं.
हि कुठली कपोलकल्पित कथा नाही किंवा एखाद्या कादंबरीचाही भाग नाही.. अगदी वास्तवात घडलेली परळी तालुक्यातील हि घटना आहे. परळी तालुक्यातील कौठाळी येथील हरिभाऊ यादव घुले या शेतकऱ्याचे २५ वर्षापूर्वी लग्न झाले. साहजिकच लग्नानंतर काही काळात हरीभाऊंना आणि कुटुंबियांना अपत्यप्राप्तीचे वेध लागले. परंतु, महिने सरले, वर्षे सरली तरी अपत्याचे कुठलेही लक्षण दिसेना. मग देवाकडे साकडे घालण्यास सुरुवात झाली. परिसरातील, जिल्ह्यातील सर्व देवस्थाने, नवसाचा देव असा एकही देव सोडला नाही जिथं डोकं टेकवलं नाही.. दवाखाने पालथे घातले, डॉक्टरांना दाखवले. ना-ना उपचार केले. पण यश आलेच नाही. शेवटी हरिभाऊंच्या पत्नी शकुंतलाबाई यांनी मनाचा मोठेपणा आणि समजूतदारपणा दाखवत हरीभाऊंना दुसऱ्या लग्नासाठी तयार केले. १० वर्षापूर्वी हरीभाऊंचे दुसरे लग्न औरंगपुर येथील गंगाबाई यांच्याशी झाले. पण यावेळेसही दुर्भाग्याने पिच्छा सोडला नाही. महिने, वर्षे उलटली तरी देखील अपत्यप्राप्ती झाली नाहीच. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणत देव-देव, नवस, दवाखाने झाले पण त्यांची अपत्याची इच्छा अधुरीच राहिली. अखेर वर्षभरापूर्वी एका जवळच्या व्यक्तीने हरीभाऊंना परळी येथील डॉ. काळे यांच्याकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला. डॉ. काळे यांनी देखील या दांपत्याला धीर देत सर्व उपचार करतो, परंतु सर्व पथ्ये पाळण्याची, उपचारांची तुमची पूर्ण तयारी ठेवा असे सांगितले. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि गंगाबाई गर्भवती राहिल्या. चाचणी दरम्यान गंगाबाईंच्या पोटात तिळे असल्याची कल्पना डॉक्टरांना आली होती. मग त्यांनी हरीभाऊंना अधिक काळजी घेण्याचे सांगून व्यवस्थित मार्गदर्शन केले.
अल्पशिक्षित आणि खेड्यात राहत असूनही हरीभाऊंनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पत्नीच्या गरोदरपणातील सर्व अत्याधुनिक चाचण्या, आहार याकडे व्यवस्थित लक्ष ठेवले. त्यांच्या पहिल्या पत्नी शकुंतलाबाई यांनी अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे गंगाबाई यांची काळजी घेतली. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचे प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी सल्ल्य दिल्यानुसार प्रसूतीच्या संभाव्य तारखेच्या महिनाभर आधी गंगाबाईंना या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर दि. ६ जून रोजी रात्री ११.१७, ११.१८ आणि ११.१९ वाजता असे सलग एक-एक मिनिटाच्या अंतराने गंगाबाईंनी एक मुलगा आणि दोन मुलीस जन्म दिला आणि हरीभाऊंची २५ वर्षापासूनची अपत्यप्राप्तीची प्रतीक्षा संपली. वयाच्या ५० व्या वर्षी हरिभाऊ एकदाच तीन-तीन लेकरांचे बाप झाले. डॉ. बनसोडे यांच्या विभागातील डॉक्टरांनी हि प्रसूती व्यवस्थितरित्या आणि यशस्वीपणे पार पाडली. तिन्ही बालकांची तब्येतही एकदम ठणठणीत आहे. दहा दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर गंगाबाईंना आणि तिन्ही बाळांना सुट्टी देण्यात आली. सध्या हे सर्वजण गंगाबाईंच्या माहेरी औरंगपुर येथे आहेत. बाळांच्या दोन्ही आई, आजी, आजोबा, नातलग त्यांचे कोडकौतुक करण्यात गुंग आहेत. देवाने एकदाच भरभरून दान दिल्याने खूप आनंदी असल्याचे आई गंगाबाई यांनी सांगितले तर २५ वर्षांपासून ज्या भावनेसाठी तरसले होती ती या लेकरांच्या आगमनामुळे पूर्ण झाली असल्याचे मनोगत ‘मोठी आई’ शकुंतलाबाई यांनी व्यक्त केले. सध्या तिन्ही बाळांच्या आवाजाने घर मात्र अगदी गलबलून गेले आहे. या तिळ्यांना पाहण्यासाठी आणि घुले कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी नातलग, ग्रामस्थ गर्दी करत आहेत.
लेकी झाल्याचा आनंद अधिक मोठा
“मागील २५ वर्षापासून लेकराची वाट पाहत होतो. देवाने एकदाच तिघांचा बाप केलं आणि सर्व कसर भरून काढली. मला नेहमीच एकतरी मुलगी असावी वाटत होती, पण आता मी पोरासोबतच दोन मुलींचाही बाप आहे. मुलींचा बाप झाल्याचा आनंद सर्वात मोठा आहे.”
– हरिभाऊ घुले, कौठाळी
साडेसहा हजार गर्भधारणेत एका तिळ्याची शक्यता : डॉ. संजय बनसोडे
“हेलीनच्या नियमानुसार सर्वसाधारणपणे साडेसहा हजार गर्भधारणातून एका तिळ्याची शक्यता आढळते. त्यातही सर्व बालके सुखरूप जन्म घेण्याचे प्रमाण कमीच असते. मात्र, गंगाबाई घुले या अत्यंत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ताकतीच्या महिला असल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया होऊनही अजिबात रक्तस्त्राव न होता त्यांची प्रसूती सुखरूप पार पडली. तिळे जन्मल्यास त्यात मुलींचे प्रमाण अधिक असते. इथेही दोन मुली आणि एक मुलगा जन्मला. माता आणि तिन्ही मुलांची तब्येत एकदम ठणठणीत आहे. असे अभावानेच पहावयास मिळते.”