डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने रक्त, रक्ताचा तुटवडा आणि रक्तपेढीच्या माहितीवर वार्तालाप संपन्न
मुबलक रक्त पुरवठा होण्यासाठी रक्तदानाच्या जनजागृतीची गरज –शैलेंद्र भागवत
(श्रीराम कांदु)
डोंबिवली : रक्ताचा तुटवडा येतो तेव्हाच रक्तपेढीकडे सामान्यांचे लक्ष जाते. आरोग्य विषयक जागरूक सामाजिक लोकंच रक्तदान शिबिरे आयोजित करतात. अगदी ठराविक नागरिक रक्तदान करतात पण मुबलक पुरवठा होण्यासाठी रक्तदानासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे असे वक्तव्य प्लाझ्मा रिसर्च ट्रस्ट रक्तपेढीचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र भागवत यांनी केले.
डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने प्लाझा रक्त पेढीच्या माध्यमातून रक्तदान केल्यानंतर त्याचे विघटन कशा प्रकारे केले जाते. रक्त, रक्ताचा तुटवडा आणि रक्तपेढीची माहिती या विषयावर वार्तालाप कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी भागवत बोलत होते. यावेळी संस्थेचे मुख्य पॅथलॉजिस्ट डॉ. एच.ए. शाह, डॉ. अपर्णा बागुल, मुख्य व्यवस्थापक अर्पिता दिघे उपस्थित होते.
प्लाझा रक्त पेढी गेली 25 वर्षे सुमारे 125 थॅलेसिमियाच्या रुग्णांना मोफत रक्त देत आहे. विशेष म्हणजे लाल रक्तपेशी स्वच्छ करून नंतर सलाईनच्या माध्यमातून दिल्या जातात त्या ही मोफत असतात. मुंबईमधील कोकिळाबेन रुग्णालयात ज्या पद्धतीने “सिंगल डोनर प्लेटलेट” सुविधा आहे त्याच पद्धतीची सुविधा डोंबिवलीतील प्लाझ्मा रक्तपेढीत असून त्यासाठी स्पेशल मशिनरी बसविण्यात आल्या आहेत. “आयएच-1000” या अमेरिकन रोबॅटिक हॅन्डस मशीन पद्धतीने अे.बी.ओ. रक्त गट व्यतिरिक्त केल, डफी, कीड, अशा दहा प्रकारच्या नव्या रक्तगटांचे वेगळेपण या रक्तपेढीत केले जाते.
येथील अॅबॉट व जॉन्सन आणि जॉन्सन च्या स्वयंचलित मशिनरीमुळे रक्तातील एच.आय.व्ही., एच.सी.व्ही., एच.बी.व्ही. यांची टेस्ट होत असल्याने एच.आय.व्ही. व इतर धोका कमी होतो. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याला व्ही.ओ.एल. कार्ड दिले जाते. प्लाझ्मा रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा होत नाही पण उन्हाळ्यात व डेंग्यू आदी रोगराईच्या काळात रक्तदान कमी झाल्यास रक्त तुटवडा होतो यामुळे मुबलक रक्त पुरवठा होण्यासाठी रक्तदानाच्या जनजागृतीची गरज होणे आवश्यक आहे. या संस्थेच्या माध्यमातून डोंबिवली ते कर्जतपर्यत रक्तपुरवठा केला जात आहे. तसेच प्लाझ्माने 26/11चा ताज बॉम्ब ब्लास्ट घटनेच्या वेळी मोफत रक्त पुरवठा केला असून वेळोवेळी सरकारी रुग्णालयांना रक्त पुरविले जाते. प्लाझ्मा रक्तपेढीचे वातानुकूलित 40 खुर्च्याचे अद्यावत सभागृह असून ते वैद्यकीय व शैक्षणिक कार्यासाठी मोफत दिले जाते.