डोंबिवलीत महिलांच्या कुस्ती सामन्यात ठाण्यातील सरोज पवारची बाजी
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – गावदेवी मंदिर संस्थान मोठागाव-ठाकुर्ली देवीचा पाडा गावदेवी मातेच्या जत्रेत डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथे आयोजित केलेल्या जंगी कुस्तीच्या सामन्यात ठाण्यातील सरोज पवार हिने कल्याणच्या भाग्यश्री गडकर हिला कमी वेळात हरवून बाजी मारली. गावदेवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा केडीएमसीचे माजी महापौर पुंडलिक म्हात्रे आणि शिवसेनेचे नगरसेवक दिपेश म्हात्रे आणि नगरसेवक राजेश मोरे यांच्या हस्ते सरोजला चांदीची गदा, ५ हजार रुपयांचा धनादेश आणि १ हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
या सामन्यात पुरुष आणि महिला अश्या एकूण ३०० पेक्षा जास्त पेहलवानांनी भाग घेतला होता. सरोज आणि भाग्यश्रीचा यांच्यातील कुस्ती पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरोज मुंबईतील रिझवी महाविद्यालयात शिकत असून ठाण्यातील कुस्तीगीर भवन येथे गेली २ वर्ष प्रशिक्षण घेते. राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविलेल्या सरोजला भारतासाठी प्रतिनिधित्व करायचे आहे. तिचे प्रशिक्षक प्रेमचंद अकोले म्हणाले, एका महिला पेहलवानचा महिन्याचा खर्च १० हजार रुपये होतो. एवढा खर्च तिच्या कुटुंबियांना परवडणार नाही. त्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन त्यांना आर्थिक मदत करावी अशी विनंती केली. तर प्रशिक्षक विलास बावले यांनी कुस्तीच्या खेळात महिलांहि पुढे आल्याचे सांगितले. नगरसेवक दिपेश म्हात्रे म्हणाले, या सामन्यात सातारा ,सांगली आणि कोल्हापूर येथून पेहलवान आले होते. गावची जुनी परंपरा जपत मातीतील कुस्ती पाहण्यासाठी गावाबाहेरील ग्रामस्थ येत असतात. या सामन्यात भाग घेतलेल्या मिलिटरी मधील एका पेहलवानने प्रतिस्पर्धीला हरवले.
दंगल चित्रपटामुळे प्रोत्साहन मात्र सरकारची पाठ …
कुस्ती खेळावर प्रदर्शित झालेल्या `दंगल` चित्रपटामुळे महिलाना प्रोत्साहन मिळाले आहे. हा खेळ खेळण्यासाठी महिला पुढे येत आहेत. मात्र सरकारला पाठ दाखवत आहे.वास्तविक सरकारने प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे. पण सरकार का लक्ष देत नाही असा प्रश्न पडतो.