डोंबिवलीत मंदिरे फोडून दानपेट्या लांबविणारी सराईत दुकली जेरबंद, 4 मंदिरे फोडल्याची कबूली
(श्रीराम कांदु )
डोंबिवली : जिथे गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांची माथी टेकली जातात. आनंदापासून संकटापर्यंत सगळे आपल्या भावना व्यक्त करतात. शांत व निरामय वातावरणाची जेथे प्रचिती येते त्या मंदिरातील देवाची धन-दौलत लुटणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने मुसक्या आवळून गजाआड करण्यात यश मिळविले. गेल्या वर्ष-सव्वा वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या चोरट्यांनी तब्बल 4 गुन्ह्यांची कबूली दिल्याने क्राईम ब्रँचही अवाक् झाली आहे.
हुसेन मोहंमद पावटे (24, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, डोंबिवली-पूर्व) आणि अक्षय कचरू अहिरे (20, त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी, डोंबिवली-पूर्व) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून मंगळवारी कल्याण कोर्टात उभे केले असता कोर्टाने या दुकलीला अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवली-कल्याण रोडला पाथर्ली स्मशानभूमी येथे ही दुकली येणार असल्याची खबर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यानुसार फौजदार नितीन मुधगुण यांच्या नेतृत्वाखाली सतीश पगारे, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, अजित राजपूत, विठोबा सुर्यवंशी या पथकाने सोमवारी रात्री या पथकाने परिसरात जाळे पसरले. तासाभराच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे दोघे चोर पावलांनी तेथे आले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच हे दोघे तेथून धूम ठोकून समोरच्या झोपडपट्टीत दिसेनासे झाले. मात्र पोलिसांनी आडवळणे, अरूंद पाऊलवाटा आणि गल्लीबोळातून थरारक पाठलाग करून दोन्ही चोरांची गठडी वळली. पोलिसी खाक्या मिळताच अटक केलेल्या चोरांनी डोंबिवली परिसरातील चार मंदिरे फोडल्याची कबूली तर दिलीच, शिवाय टिळकनगर येथिल गणपती मंदिर फोडून तेथिल चोरलेली दानपेटी व काही दानाच्या रक्कमेसह लोखंडी कटावणी क्राईम ब्रँचच्या स्वाधीन केली. या दुकलीने अनेक चोऱ्या, घरफोड्या केल्या असाव्यात असा कयास असून क्राईम ब्रँच त्यादिशेने सखोल तपास करत आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
बातमीसाठी सोबत दोन्ही चोरांचे फोटोज् जोडले आहेत..