डोंबिवलीत धक्कादायक घटना, खर्चाला पैसे देत नाही म्हणून बेरोजगार मुलाकडून पित्याची हत्या

वडील शेजाऱ्या-पाजाऱ्यांना खर्चाला पैसे देतात. मात्र आपल्याला खर्चाला देखील पैसे देत नसल्याच्या रागातून बेरोजगार मुलाने वडिलांवर धारदार कैचीने व हातोडीने हल्ला करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुभाषचंद्र हरके (70) असे मृत पित्याचे नाव आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी खूनी मुलगा अरविंद हरके विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ माजली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील कोपर रोडला शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील सुदामा कान्हा म्हात्रे इमारतीत राहणारे 70 वर्षीय सुभाषचंद्र हरके आपला मुलगा अरविंद हरके (38) याच्यासोबत राहत होते. सुभाषचंद्र हे निवृत्त इन्कमटॅक्स अधिकारी होते. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यांचा मुलगा अरविंद याला बीआरसी कंपनीतून काढून टाकण्यात आले असल्यामुळे तो सद्या बेरोजगार झाला आहे.

अरविंद हा त्याचे वडील सुभाषचंद्र यांच्याकडे खर्चासाठी पैसे मागायचा. त्यातून दोघांमध्ये खटके उडत असत. वडील सुभाषचंद्र हे नातेवाईकांना पैसे देत असत. मात्र खर्चाला कमी पैसे देत असल्याने अरविंद याला राग आला होता. याच रागाच्या भरात सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याचे वडिलांशी भांडण  झाले. या वादातून अरविंदने हातात मिळालेली कैची त्याच्या गळ्यात खुपसली. एवढ्यावरच न थांबता त्याने डोक्यावर हातोडीने प्रहार केला. या हल्ल्यात सुभाषचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. याच दरम्यान आरडाओरड झाल्याने आसपासच्या रहिवाश्यांनी हरके यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत सुभाषचंद्र यांचा रक्ताच्या थारोळ्यात तडफडून मृत्यू झाला होता. तर पित्याच्या हत्येनंतर अरविंद तेथून पळून गेला होता. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी  माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. विष्णूनगर पोलिसांनी अरविंद हरके विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलिस अधिकारी बी. एस. पवार करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.