डोंबिवलीत चोरट्यांचा शाळेसह घरावर डल्ला
कल्याण दि.०१ – कल्याण डोंबिवली मध्ये घरफोडीचे सत्र सुरूच असून या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. डोंबिवली पूर्वेकडील टंडन रोड वरील एस के पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल एंड ज्युनियर कॉलेज च्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून प्रवेश करत कार्यालयातील ६८ हजार ८३५ रुपयांची रोख रक्कम चोरून नेली.
सदर बाब निदर्शनास येताच या प्रकरणी सोमवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
तर दुसरी घटना डोंबिवली पश्चिम येथे घडली आहे. डोंबिवली पश्चिम गणेश नगर वक्रतुंड सोसायटी मध्ये राहणारे रोहिणी तायडे या काल सकाळी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील रोकड सोन्याचे दागिने असे मिळून एकूण १ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी तायडे यांनी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.