डोंबिवलीतील नाराज शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – शिवसेनेत अन्याय होत असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना निवडणुकीपुरते वापरले जाते. मात्र दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना निवडणुकीत तिकीट दिले जाते असा आरोप करत डोंबिवलीतील शिवसेनेचे विभागप्रमुख उमेश साळवी यांनी रविवारी १०० कार्यकर्त्यांसह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड वरील भाजप जनसंपर्क कार्यालयात राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती उमेश साळवी यांनी अनेक शिवसैनिकांसह भाजपचा झेंडा हाती घेऊन जाहीर प्रवेश केला. यावेळी साळवी म्हणाले, शिवसेनेत ३० वर्ष प्रमाणिकपणे काम करून न्याय मिळत नाही. ज्या ठिकाणी शिवसेनेचे बोर्ड लावले जात नव्हते त्या ठिकाणी शिवसेनेचे काम केले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतून आलेल्यांना निवडणुकीत तिकीट दिले जाते. मी इतकी वर्ष संघटनेचे काम केले त्याकडे पक्षांनी का लक्ष दिले नाही.एका वर्षापूर्वी मी शिवसेनेचे काम करणे बंद केले मात्र जिल्यातील एकही नेत्यांनी याची दाखल घेतली नाही. आजही काही कार्यकर्ते घाबरून शिवसेनेत आहेत. मात्र त्यांनी घाबरायचे कारण नाही. भाजप हा पक्ष सर्वधर्मसमभाव असल्याने या पक्षात जाणे पसंत केले. यापुढे भाजपच्या कामाला सुरुवात करणार आहे. राज्यमंत्री चव्हाण म्हणाले, शिवसेनेत जे तीस वर्षात घडले नाही ते प्रामाणिक कार्यकर्त्याला नक्कीच न्याय मिळेल.