डोंबिवलीतील ‘आपत्कालीन ‘कक्ष मदतीच्या प्रतीक्षेत 

आपत्कालीन कक्षाची वास्तूच धोकादायक 

(श्रीराम कांदु)

डोंबिवली :8  स्‍कायमेट आणि भारतीय हवामान खात्‍याने येत्या तीन दिवसात अतिवृष्‍टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्‍त गोविंद बोडके यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्‍याचे आदेश दिले. परंतु डोंबिवली विभागी कार्यालयातील आपत्कालीन कक्षातील साधनसामुग्री इतिहासकालीन असून येणाऱ्या आपत्तीला कसे सामोरे जायचे असा सवाल कामगारांपुढे आहे. यामुळे मृतावस्थेत असणाऱ्या आपत्त्कालीन कक्षाने सतर्क राहून फक्त “हाताची घडी तोंडावर बोट” अशा परिस्थितीत येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायचे हा गहन प्रश्न आहे.आपत्कालीन कक्षाला खरं म्हणजे मदतीची गरज आहे 

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात ‘ग’ व ‘फ’ प्रभाग क्षेत्र आणि नागरीसुविधा केंद्र माध्यमातून कारभार चालतो. डोंबिवली विभागाला स्वतंत्र उपायुक्त नसल्याने संपूर्ण कारभार कल्याणच्या मुख्याल्यातुनाच होत  आहे. डोंबिवलीकरांची स्वतंत्र उपायुक्तच्या मागणीलाही केराची टोपली दाखविण्यात आली आहे. अशा पद्धतीमुळेच सर्व कारभार ‘राम भरवसे’ होत आहे.

पावसाळा सुरू झाला कि प्रशासनाला आपत्कालीन कक्षाची आठवण येते. त्याप्रमाणे नंतर कामकाजाची आखणी केली जाते. डोंबिवलीतील आपत्कालीन कक्षाला गळती लागली असून ती गळती थांबविण्यासाठी पत्र्यावर प्लास्टिकची ताडपत्री अंथरली असून गळती बंद केल्याचे काम पूर्ण केले असे भासविण्यात आले आहे. परंतु गळती पुन्हा सुरु होईल असे कामगाराच सांगत आहेत. मुख्य म्हणजे ज्या पत्र्याच्या शेडला आपत्कालीन कक्ष म्हणून संबोधिले जाते तिच्या भिंतीनाही तडा गेल्या आहेत. कक्षाच्या चारही कोपऱ्यात प्लास्टर पडले असून कक्षाची इमारत धोकादायक असून कामगार जीव मुठीत घेऊन तिथे दिवस ढकलत आहेत 

आपत्कालीन परिस्थितीसाठी एकूण 7 अधिकारी आणि 19 कामगारांचा लवाजमा तयार करण्यात आला आहे. एकूण तीन पाळीत अधिकारी व कामगारांची विभागणी करण्यात आली असून प्रत्येक पाळीत दोन अधिकारी व सहा कामगार तैनात ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी कक्षातील परीस्थिती अतिशय वाईट आहे. कक्षातील वायरलेस यंत्रणा पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. याला कारण म्हणजे होमबाबा टेकडी येथे वायरलेस यंत्रणाचे मुख्य कंट्रोल असून ते तुटले आहे असे खास सूत्रांकडून समजते. कक्षात दोरी, कोयते आदी वस्तू असल्या तरी त्या कामाच्या नाहीत कारण कोयता आहे पण त्याने गवतही कापले जाणार नाही अशी धारधार आहे. दोरी आहे पण ती कामाची नाही. विशेष म्हणजे जे कामगार आहेत त्यातील तीन कामगार रुग्णावस्थेतील असल्याने प्रथम त्यांचीच काळजी इतर कामगारांना घ्यावी लागत आहे. परिणामी फक्त आपत्कालीन कक्ष आमच्याकडे आहे असा रकाना प्रशासनाने भरून आम्ही कोणत्याही परिस्थित २४ X ७ धर्तीवर यंत्रणा सज्ज आहे असे भासविले आहे. पण जर खरोखरच घटना घडली तर मात्र आपत्कालीन कक्षाचे तीन तेरा वाजणार असे खुद्द कामगाराच खाजगीत बोलत आहेत.

मात्र याबाबत प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी संपर्क साधला असता सर्व काही ठाकठीक आहे. आपत्कालीन कक्षासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत असेही त्यांनी सांगितले.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email