डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रविवार, १३ मे रोजी शिबिराचे आयोजन
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने कल्याणमध्ये विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबीर
कल्याण : तीर्थस्वरूप पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि मुंबई-ठाणे येथील विविध नामांकित हॉस्पिटल तथा कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे शहरातील सर्व डॉक्टर्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण विनामूल्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याणच्या आर्य गुरुकुल शाळा, नांदिवली गाव, श्री मलंगगड रोड, कल्याण (पुर्व) ठाणे याठिकाणी १३ मे २०१८ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सर्व प्रकारच्या आजारावर रुग्णांची तपासणी व निदान करण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांना मोफत औषधे त्वरित देण्यात येणार आहे. शिवाय ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत किवा सवलतीच्या दरात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे-शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर २०१७ पासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम ठाणे (पूर्व) येथील कोपरी कार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील गंभीर आजाराने ग्रस्त विविध गरजू रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी व उपचारांसाठी या कक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात, तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५०० गरजू रुग्णांना अंदाजे तीन कोटी रुपयांपर्यंतची मदत या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
त्याचेच पुढचे पाऊल म्हणून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसाधारण तपासणीपासून हृदयरोग, कर्करोग, त्वचारोग, मेंदू रोग,अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मूत्रविकार, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह, श्वसनाचे विकार, कान,नाक, घसा, प्लॅस्टिक सर्जरी, दंतरोग, लठ्ठपणा, हार्निया, अॅपेंडिक्स, आतड्याचे विकार, अस्थिव्यंगोपचार, बालहृदयविकार अशा विविध आजारांची तपासणीशिबिरात विनामूल्य करण्यात येणार आहे.
या सर्व प्रकारच्या आजारांवर येथे तपासणी व उपचार केले जाणार असून आयुर्वेदिक औषधोपचारासाठीही स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. हृदयाला छिद्र असलेल्या बालकांवर देखील या शिबिराच्या माध्यमातून शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात लहान मुलांच्या हृदयाची 2D इको तपासणी होणार नाही, परंतु या शिबिरात 2D साठी विशेष नाव नोंदणी करण्यात येईल. नाव नोंदणी केलेल्या लहान मुलांची जून महिन्यात सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये मोफत2D इको तपासणी आणि निदान झालेल्या बालकांची मोफत/सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येतील.
तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील, तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या शिवसेना शाखेत प्राथमिक नोंदणी करावी आणि या विनामूल्य महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.