डीजे वाजविणे पडणार चांगलेच महागात
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांकडून डॉल्बी सिस्टीम लावण्यात येते. डॉल्बी सिस्टीम लावू नये, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंध केला जातो. त्यानंतर मंडळांविरुद्ध ध्वनिप्रदूषण अधिनियम 2000, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986नुसार गुन्हे दाखल केले जातात. मात्र, पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असताना पोलीस आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात संघर्ष होऊन तणावाची परिस्थिती निर्माण होते. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी गणेश मंडळांनी डॉल्बी सिस्टीमचा वापर करू नये, असे आवाहन डॉ. कटारे यांनी केले आहे.
उच्च न्यायालयाने डीजे, डॉल्बी म्युझिक सिस्टीमवर तूर्त बंदीचा आदेश दिला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी पुणे शहर आणि जिह्यात करण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करीत डॉल्बी सिस्टीम लावणारी मंडळे आणि सिस्टीमचे मालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.
जिह्यात गेल्या वर्षी वेल्हा, लोणी कंद आणि जेजुरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत डॉल्बी सिस्टीम लावल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. विविध सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ध्वनिप्रदूषणाबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाने कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले असून, या वर्षीही कारवाई होणार असल्याचे डॉ. कटारे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.