डम्पिंगच्या आगीमधून आर्थिक लाभ ; राज्य शासन करणार अधिकारी-लोकप्रतिनिधींची चौकशी

मुंबई – कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवर सतत लागणाऱ्या आगीमधून प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा आर्थिक लाभ होतोय का? या प्रकरणाची राज्य शासनाकडून चौकशी करण्यात येणार आहे. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधिमंडळात त्याबाबतची घोषणा केली. कल्याण पूर्वेतील आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी डम्पिंगच्या आगीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

3 दशकांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही कल्याण डोंबिवलीचा डम्पिंगचा प्रश्न सुटू शकलेला नाही. गेल्या काही वर्षांत इथल्या कचऱ्याने आणि कचऱ्याच्या आगीने उग्र रूप धारण केले आहे. महापालिका लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर आपला अजिबात विश्वास राहिलेला नसून यामागे लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकरी आणि ठेकेदार यांच्याकडून जाणून बुजून हे घडवलं जातंय का? आर्थिक लाभातून हे सर्व घडतंय का? असे प्रश्न उपस्थित करीत आमदार शिंदे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली.

त्यावर उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री यांनी ही अतिशय गंभीर बाब असल्याचे सांगत याप्रकरणी चौकशीची घोषणा केली. तसेच केवळ तांत्रिक पुढे करीत यासंदर्भातील निविदा फेटाळण्यात येत असतील तर शासन स्तरावर एक बैठक घेऊन योग्य ते निर्देश दिले जाणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच महापालिकेने यासंदर्भात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल शासनाकडे पाठवण्याचे निर्देशही नगरविकास राज्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email