ठाणे येथे “एक भारत श्रेष्ठ भारत” खो – खो स्पर्धा व भारत नेपाळ आंतरराष्ट्रीय खो-खो सामन्याचे आयोजन
भारतीय खो – खो महासंघाच्या मान्यतेने “एक भारत श्रेष्ठ भारत” खो – खो स्पर्धा व भारत नेपाळ आंतरराष्ट्रीय खो-खो मालिकेच्या सामन्याचे आयोजन महाराष्ट्र खो – खो असोसिएशन व ठाणे जिल्हा खो – खो असोसिएशन यांच्या विद्यमाने बुधवार दि. ३० मे, २०१८ रोजी सायंकाळी ठिक ६.०० वाजता शाहीर दामोदर विटावकर क्रिडा नगरी (पऱ्याचे मैदान) विटावा कोळीवाडा, कळवा, ठाणे येथे स्थानिक आमदार व माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या यजमान पदाखाली आयोजन करण्यात आले आहे.
क्रिडा व युवक कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्यावतीने देशातील राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी, वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती समजून घेण्यासाठी प्रथमच “एक भारत श्रेष्ठ भारत” खो – खो स्पर्धेचे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात येत आहे. या स्पर्धेकरिता दोन राज्यांचा मिळून एक संयुक्त संघ असे देशातील ३२ राज्यांचे पुरुष व महिलांचे १६ संघ सहभागी झाले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र व ओरिसा या दोन राज्यांचा मिळून एक पुरुष व एक महिला संघ तर दुसरा पॉंडिचेरी व दिव – दमण या दोन राज्यांचा मिळून एक संघ असे पुरुष व महिलांचे खो – खो सामने दि. ३० मे, २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार आहेत. या स्पर्धेतील विजेता संघ रांची येथे होणाऱ्या या स्पर्धेच्या पुढील दुसऱ्या फेरीकरिता पात्र होणार आहे.
त्याचप्रमाणे खो – खो खेळाच्या आंतरराष्ट्रीय मान्यतेसाठी भारत विरुद्ध नेपाळ असा पुरुषांचा चौथा मालिका सामना होणार आहे. नेपाळ या देशाचा पुरुष संघ भारतामध्ये दिनांक २० मे, २०१८ रोजी इंडो – नेपाळ मालिकेसाठी दाखल झाला असून भारत विरुद्ध नेपाळ या मालिकेचा पहिला सामना फरीदाबाद, हरियाणा येथे दिनांक २२ मे, २०१८ रोजी, दुसरा सामना अजमेर, राजस्थान येथे दिनांक २५ मे, २०१८ रोजी, तिसरा सामना इंदोर, मध्यप्रदेश येथे दिनांक २७ मे २०१८ रोजी, चौथा सामना ठाणे महाराष्ट्र येथे दिनांक ३० मे, २०१८ रोजी आणि पाचवा सामना दिनांक २ जून, २०१८ रोजी पटणा, बिहार येथे आयोजित करण्यात आले आहेत.
ठाणे येथे होणाऱ्या “एक भारत श्रेष्ठ भारत” सामन्याची व भारत विरुद्ध नेपाळ या आंतरराष्ट्रीय सामना आयोजनाची तयारी ठाणे जिल्हा खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, राज्य संघटनेचे सचिव – डॉ. चंद्रजीत जाधव, कमलाकर कोळी, तुषार सुर्वे व निशिकांत कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.