ठाणे जिल्ह्यातील विकास प्रकल्प पूर्ण करतांनाच स्थानिक भूमिपूत्रांना न्याय देणार- मुख्यमंत्री

ठाणे – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर व संलग्न ठाणे जिल्ह्यात दीड लाख कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधा उभारणीचे प्रकल्प सुरु केले असून त्यातील 50 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प एकट्या ठाणे जिल्ह्यात सुरु आहेत. तथापि हे प्रकल्प पूर्ण करतांना स्थानिक भूमिपूत्रांना तसेच या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्यांना त्वरीत न्याय देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.ठाणे जिल्ह्यातील मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील घणसोली तळवली उड्डाण पूल, महापे भूयारी वाहन मार्गिका व सविता केमिकल येथील उड्डाणपुल उद्घाटन ,  ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला जोडणारा रस्ता, कोपरी ठाणे येथील रेल्वे ओलांडणी पूलाचे भूमिपूजन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ऐरोली येथे झाले.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की,  ठाणे जिल्ह्यातील या भागात रहदारीच्या कोंडीची मोठी समस्या होती. ही समस्या या नवीन प्रकल्पांमुळे संपुष्टात येऊन सुरळीत अडथळा विरहित वाहतुकीची  अनुभूती नागरिकांना घेता येईल. नव्या तंत्रज्ञानाने उड्डाणपूल उभारणी ही वर्षभरात पूर्ण होऊ शकते. त्यामुळे लवकर या सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होतील. या शिवाय या भागात मेट्रॊ वाहतुकीचे जाळे विकसित करण्यात येत आहे.  देशातील सर्वाधिक मोठे मेट्रो नेटवर्क सध्या ठाणे जिल्ह्यात उभारण्यात येत असून येत्या 2 ते 3 वर्षात ही सर्व कामे पूर्ण झालेली असतील. मुंबई परिसरातील कोणत्याही एका भागातून दुसऱ्या भागात तासाभरात पोहोचता येईल अशा रस्ते व दळणवळणाच्या  पायाभूत सुविधा निर्मितीस चालना दिली जात आहे. यात जलमार्गाचाही वाहतुकीसाठी वापर करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर माल वाहतुक ठाणे जिल्ह्यातून होत असते. या वाहतुकीला पर्यायी मार्ग म्हणून रोरो जलसेवा सुरु करण्याचेही प्रस्तावित आहे. या शिवाय शासन किनारी मार्गाच्या प्रस्तावाचीही तपासणी करीत आहे. या सर्व कामांमधून मुंबई  महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ही लोकाभिमुख संस्था म्हणून पुढे येत आहे, याबद्दल  फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. निर्माण झालेल्या विकसित भागाचा आर्थिक चलनवलनासाठी अधिकाधिक वापर वाढविण्याचे शासनाचे धोरण असून या विकास प्रकल्पामुळे स्थानिक भुमिपूत्र व प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांचीही सोडविण्यासाठी तातडीने निर्णय घेऊ, असेही त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. तसेच झालेल्या कामांच्या दर्जा व गुणवत्तेबद्दलही मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.यावेळी मुख्यमंत्री यांच्याहस्ते  अधिक्षक अभियंता शरद वरसाळे, कार्यकारी अभियंता मिलिंद जैतपाल, उपअभियंता गुरुदत्त राठोड , अमोल खैर यांचा सत्कार करण्यात आला.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या सुविधांची कामे अधिकाधिक जलद होऊन जिल्हावासीयांना त्यांचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 रविंद्र चव्हाण म्हणाले की, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची कामे मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी केली. त्याला चालना देतांनाच  ठाणे जिल्ह्यावर विकासाचा प्रकाश झोत पडला. शहरे आणि ग्रामिण भाग या रस्ते पायाभूत सुविधा विकासामुळे जवळ येत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानगरआयुक्त आर. ए. राजू यांनी केले. त्यात आगामी काळात करावयाच्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. आभारप्रदर्शन अति. महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी केले.

यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री  रविंद्र चव्हाण, खा. राजन विचारे, खा. कपिल पाटील,  आ. मंदाताई म्हात्रे, आ. किसन कथोरे, आ. प्रताप सरनाईक, आ. संजय केळकर, आ. सुभाष भोईर, आ. संदीप नाईक, आ. गणपत गायकवाड, आ. नरेंद्र पवार, आ. नरेंद्र पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, महानगरआयुक्त आर. ए. राजू, अति. महानगर आयुक्त प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

असे आहेत प्रकल्प

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी, ठाणे येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे रुंदीकरण व बांधकाम करणे

उद्दिष्ट :            पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी, ठाणे येथील सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे ओव्हरब्रीज येथील वाहतूक कोंडी दूर करणे.

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये :

 1. प्रकल्पाचा खर्च                                                 : रु. 258.76 कोटी
 2. पोचमार्गाच्या कामाचा खर्च                                : रु.168.76 कोटी

(मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत कार्यान्वित)

 1.  रेल्वे भागातील पूलाच्या कामाचा खर्च              : रु.90 कोटी

(  प्राधिकरणाच्या निधीतून रेल्वेमार्फत कार्यान्वित)

 1.  कार्यादेश दिनांक पोचमार्गाचे काम                    : 24 एप्रिल 2018
 2. कामाचा कालावधी                                           : 36 महिने (18+18 महिने)
 3. काम पूर्ण होण्याचा अपेक्षित दिनांक                   : 23 एप्रिल 2021
 4. पूलाची एकूण लांबी                                           : 796 मी. (रेल्वेपूलासहित)
 5. रेल्वे पूलाची लांबी                                            : 65 मी.
 6. पोच मार्गाची लांबी                                            : 406 मी (मुंबईदिशेकडे)+325 मी. (ठाणेदिशेकडे)
 7. पूलाची रुंदी                                                        : 37.40 मी. (4+4) मार्गिका
 8. ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ 2+2 मार्गिकांचा वाहनांकरिता भुयारी मार्ग
 9. आनंदनगर येथील भूयारी मार्गाचे मजबुतीकरण
 10. तुळजा भवानी मंदिरा जवळ पादचारी पूलाचे बांधकाम

ऐरोली कटाई नाका प्रकल्पातील ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग – 4 यांना  जोडणारा रस्ताः

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ऐरोली कटाई नाका प्रकल्पातील ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग – 4 यांना जोडणा-या रस्त्याचे काम सुरु करण्याचे आदेश कार्यकारणी समितीच्या मंजुरीनंतर मे. एस. एम.सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. व मे. आय व्ही आर सी एल – एस एम सी (जेव्ही) यांना देण्यात आले आहे. हा रस्ता ठाणे बेलापूर रस्त्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पर्यंत एकूण 3.57 कि.मी. लांबीचा असून त्यात 1.70 कि.मी. लांबीचा बोगदा व 1.87 कि.मी. चा उन्नत मार्ग आहे. या कामाची किंमत रु. 382.02 कोटी आहे.

ठाणे बेलापूर रस्त्यावरील उड्डाणपुल व भूयारी वाहन मार्गिका – 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाव्दारे विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ठाणे बेलापूर रस्त्यावरील सविता केमिकल्स जंक्शन, घणसोली व तळवली नाका जंक्शन येथे उड्डाणपूल आणि महापे जंक्शन येथे भूयारी वाहन मार्गाच्या कामास दिनांक 10/03/2015 रोजी सुरुवात करण्यात आली होती. सदर प्रकल्पात ठाणे बेलापूर रस्त्यावरील घणसोली नाका व तळवली नाका हे दोन्ही जंक्शन पार करण्यासाठी एकूण 1.4 कि.मी. लांबीचा उड्डाणपूल असून तो 2 + 2 मार्गिकांचा आहे. तसेच सविता केमिकल्स जंक्शन येथील ठाणे कडून बेलापूरकडे जाण्यासाठी 2 मार्गिका असलेला 575 मी. लांबीचा उड्डाणपूलाचा समावेश आहे. त्याच बरोबर महापे जंक्शन येथे ठाणेकडून बेलापूरकडे जाण्यासाठी 3 मार्गिकांचा 485 मी. लांबीच्या भुयारी वाहन मार्गाचा समावेश आहे. सदर कामासाठीचा खर्च रु. 155.00 कोटी इतका आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी, ठाणे येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे रुंदीकरण व बांधकाम करणे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email