ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते होणार चकाचक एकनाथ शिंदे यांनी वाढवला नारळ

(म विजय)

मुरबाड तालुक्याIत ६८ किमीच्या रस्त्यांची कामे
• प्रकल्पाची किंमत ४० कोटी
• रस्त्यांचे जाळे होणार भक्कम

ठाणे – सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे सक्षम करण्याला प्राधान्य दिले असून बुधवार, २ जानेवारी रोजी श्री. शिंदे यांच्या हस्ते मुरबाड तालुक्यातील तब्बल ४० कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन झाले.
जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल आणि ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर रस्त्यांचे जाळे मजबूत करावे लागेल, या हेतूने श्री. शिंदे यांनी जिल्ह्यात रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर राज्य शासनाचा निधी आणला आहे. तसेच, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही कोट्यवधीची कामे मंजूर केली आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी शीळ-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचाही नारळ वाढवला होता.
बुधवारी मुरबाड तालुक्यातील तब्बल ६८ किमीहून अधिक रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या रस्त्यांची एकत्रित किंमत सुमारे ४० कोटी रुपये आहे. यात राज्य महामार्ग ७९ ते शिरवली वडाचीवाडी फणसोळी-सुकाळवाडी (८ किमी, ४ कोटी), धसई-कळंबाड- मढ, रामपूर रस्ता (५.३ किमी, २.७९ कोटी), राज्य महामार्ग ७८ पारगाव ते बालकीचा पाडा (६ किमी, ४.११ कोटी), राज्य महामार्ग ७९ ते पवाळे, कोळठण, भादाणे रस्ता (८.६४ किमी, ४.४५ कोटी), किसळ-धारगाव संगम रस्ता (५ .७५ किमी, ३.३६ कोटी), राष्ट्रीय महामार्ग २२२ नांदगाव-मानिवली-ठुणे-पाडाळे रस्ता (१०.३७ किमी, ५.४५ कोटी), राष्ट्रीय महामार्ग २२२ पोटगाव-उंबरवाडी-चोण रस्ता (११.६ किमी, ५.३९ कोटी), राष्ट्रीय महामार्ग २२२ टेंबरे-बुद्रुक जोड रस्ता (२.२७ किमी, १.२९ किमी) आदी महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्यांची कामे होणार आहेत.
श्री. शिंदे यांच्या हस्ते बुधवारी या कामांचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, महाराष्ट्र हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना जिल्हाप्रमुख (भिवंडी) प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.