ठाकुर्ली टर्मिनससाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू

कल्याण यार्डचेही संपूर्ण रिमॉडेलिंग होणार
कळवा-ऐरोली एलिव्हेटेड लिंकची निविदा प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून
पाचव्या-सहाव्या लाइनसाठी मार्च २०१९ची डेडलाइन

( श्रीराम कांदु )

मुंबई – मुंबई उपनगरी सेवेवरील ताण कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ठाकुर्ली टर्मिनससाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या पाठपुराव्याला यश येत असून या टर्मिनससाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया मध्य रेल्वेने सुरू केली आहे. ठाकुर्ली टर्मिनस व्हावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, तसेच लोकसभेतही वारंवार हा मुद्दा मांडला होता.

ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसदर्भात खा. डॉ. शिंदे यांनी मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. उपनगरी सेवेवरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने ठाकुर्ली टर्मिनसचे काम लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर रेल्वे बोर्डाने पीपीपी तत्त्वावर ठाकुर्ली टर्मिनस विकसित करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याचे निर्देश दिले असून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे श्री. शर्मा यांनी याप्रसंगी सांगितले.

आमदार डॉ. बालाजी किणिकर, विभागीय उपव्यवस्थापक आर. के. गोयल, एमआरव्हीसीचे परमजीत सिंग, डीएफसीसीचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी, आयआरसीटीसीचे ग्रुप जनरल मॅनेजर अरविंद मालखेडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, नगरसेवक सुभाष साळुंके, रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

ठाकुर्ली टर्मिनससोबतच कल्याण यार्डाच्या रिमॉडेलिंगचे कामही मध्य रेल्वेकडून हाती घेण्यात येणार आहे. या अंतर्गत सहा नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे कसारा-इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या आणि कर्जत-पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिका स्वतंत्र होऊन या दोन मार्गिकांवरून जाणाऱ्या गाड्या एकमेकांना क्रॉस करण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ वाचेल, तसेच, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उपनगरी गाड्या यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होणार असल्यामुळे लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होणार आहे.

पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी मार्च २०१९ची डेडलाइन

ठाण्याच्या पलिकडे लोकलच्या वाढीव फेऱ्या मोठ्या संख्येने सुरू करण्यासाठी पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. खा. डॉ. शिंदे यांचा त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून प्रकल्पातील बहुतांश अडचणी त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे दूर झाल्या आहेत. मार्च २०१९ पर्यंत ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होईल, असे श्री. शर्मा यांनी यावेळी सांगितले. या मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यानंतर ठाण्यापुढील उपनगरी गाड्यांच्या फेऱ्या मोठ्या प्रमाणावर वाढवणे शक्य होणार आहे.

कळवा-ऐरोली एलिव्हेटेड लिंकची निविदा प्रक्रिया लवकरच

ठाण्यापुढील रहिवाशांना ठाण्याला वळसा न घालता नवी मुंबईला थेट जाता यावे, यासाठी खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या कळवा-ऐरोली एलिव्हेटेड लिंकची निविदा प्रक्रियाही या महिनाअखेरीस सुरू होत असल्याची माहिती श्री. शर्मा यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाचा जॉइंट मेजरमेंट सर्व्हे पूर्ण झाला असून प्रकल्पात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या बेसलाइन सोश्यो इकॉनॉमिक सर्व्हेचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएतर्फे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात येईल, तसेच १.९ किमी लांबीच्या मुख्य एलिव्हेटेड लिंकची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही श्री. शर्मा यांनी सांगितले. ऑक्टोबर अखेरीस कळवा यार्ड, दिघा स्टेशन आणि काही उड्डाणपुलांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email