टिळकनगर विद्यामंदिर येथे सहा गुणीजनांचा होणार सन्मान
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – प्रसिद्धीची अपेक्षाही न ठेवता शहरासाठी आपलं अनमोल योगदान ज्यांनी दिलं अशा निवडक नामवंत नागरिकांचा गौरव होणार आहे. अशा या महत्वपूर्ण कार्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था एकत्र येऊन नागरी समिती स्थापन झाली. याच समितीच्या माध्यमातून सहा गुणीजनांचा सन्मान होणार आहे. रविवार, दि. ११फेब्रुवारी रोजी पूर्वेकडील टिळकनगर विद्यामंदिराच्या पटांगणावर सायंकाळी ५-३० हा सोहळा होणार आहे.
गेली पाच वर्षे अशा प्रकारचा सन्मान सोहळा होत असून या वर्षीही डोंबिवली शहराच्या गेल्या सव्वाशे वर्षांच्या वाटचालीतल्या मोठ्या टप्प्याची साक्षीदार असलेली आणि आपल्या अंगभूत गुणांच्या आधारे शहराच्या सर्वांगीण विकासात हातभार लावलेली अशी मोजकीच मंडळी आता वयोमान उलटूनही सार्वजनिक क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यातील काही त्यांच्याकार्यक्षेत्रामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिली आहेत तर काहींनी प्रसिद्धीची अपेक्षाही न ठेवता शहरासाठी आपलं अनमोल योगदान दिलं आहे. ज्यांनी प्रसिद्धीच्या झोतात राहणं पसंत केलं नाही. आणि अशाच निवडक नामवंत नागरिकांचा गावकीतर्फे सन्मान करण्यात येतो.
त्यांच्या कार्याचा आदर्श पुढल्या पिढ्यांपुढेही रहावा आणि त्यातून स्फूर्ती घेत सामाजिक बांधिलकी मानणारी, गावकीचे भान राखणारी तरुण कार्यकर्त्यांची नवी पिढी उभी रहावी या उद्देशाने नागरी सत्कार समिती प्रतिवर्षी अशा सहा डोंबिवलीकर स्त्री-पुरुषांचा सन्मान करते. वर्षी सामाजिक क्षेत्रातील विशेषतः अंधत्व निवारण क्षेत्रातील कार्यकर्त्या सरोज नेरुरकर, सामाजिक क्षेत्रातील विशेषतः आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील कार्यकर्त्या हेमा धारगळकर, कामगार क्षेत्रातील श्रीनिवास जोशी, ज्येष्ठ नागरिक संघटन क्षेत्रातील रमेश पारखे, शिक्षण आणि राष्ट्रीय सामाजिक सेवा क्षेत्रातील डॉ. कृष्णन नम्बुद्री तसेच रोटरी, वैद्यकीय मदत क्षेत्रातील एन. आर. हेगडे यांचा सन्मान समिती करणार आहे. सदर कार्यक्रम जेष्ठपत्रकार विजय कुवळेकर आणि सुधीर जोगळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
Hits: 9