जुन्या डोंबिवली गणेश घाट येथून डोंबिवलीकरांना घेता येणार जलवाहतूक करणाऱ्या खासगी बोटीचा आनंद
जलवाहतूकीसाठी विस्तिर्ण खाडी किनाऱ्याचा फायदा घेतला पाहिजे – महापौर विनिता राणे
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रातील वाहतुकीची कोंडी मुक्त करण्यासाठी जलवाहतूक होणे गरजेचे आहे. जलवाहतूकीसाठी लाभलेल्या विस्तिर्ण खाडी किनाऱ्याचा फायदा घेतला पाहिजे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण या सर्वांनी जलवाहतुक योजनेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तरीही जलपर्यटनांचा लाभ घेता यावा म्हणून जुन्या डोंबिवली गणेश घाट येथूनजलवाहतूक करणाऱ्या खासगी बोटीचा आनंद डोंबिवलीकरांना घेता येणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नवनिर्वाचित महापौर विनिता राणे यांनी शनिवारी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून खाजगी पर्यटन बोटीचे उद्घाटन केले. यावेळी सभागृह नेते राजेश मोरे,नगरसेवक विश्वनाथ राणे, महिला बालकल्याण सभापति दिपाली पाटील, नगरसेविका संगीता पाटिल माजी नगरसेवक पंढरी पाटील यांच्यासह बोट मालक विलास ठाकुर आणि कुटुंबिय उपस्थित होते.
डोंबिवली – मुंब्रा अलीमघर डोंबिवली या मार्गावर ही फेरी बोट खाडीतून मार्गक्रमण करणार आहे. जलवाहतूक बोटीसाठी २५ मे पर्यंत प्रायोगिक तत्वावर सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. सुमारे 25 ते 50 रुपयेभाडे प्रती प्रवासी आकारण्यात येणार आहे. आगामी काळात मुंब्रा भागातही ही प्रवासी फेरी बोट नेण्याचा विचार आहे. खाडी पलीकडील नागरिकांसाठी या जल वाहतूक सुविधेचा नक्कीच फायदा होईल. यावेळी विलास ठाकूर म्हणाले कि, जल वाहतूक बोटीतून प्रवासाचा आनंद घेणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. या जलबोटीमुळे डोंबिवलीकरांची पावले जुनी डोंबिवली गणेश घाटाकडे नक्कीच वळणार आहेत.