जीव मुठीत घेवुन जगत आहेत मुंबईतील ५४८ इमारतीत रहिवासी
मुंबई – स्वप्ननगरी,मायानगरी म्हणून मुंबईचा उल्लेख केला जातो परंतु मुंबईच्या चमकदार जीवनाला एक दुसरीही बाजू आहे.आपल्या श्रीमंतीबद्दल जगभर नावाजलेल्या या शहरात गरीब तसेच मध्यमवर्गीयांचे जीवन मात्र संघर्ष आणि मज़बूरी यानी भरलेले असे आहे.मुंबईतील ५४८ अतिधोकदायक इमारतीतील रहिवासी जीव मुठीत घेवुन जगत आहेत.पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबईतील ६१९ इमारतींची अवस्था फार वाईट असून त्या अतिधोकदायक आहेत.यातील केवळ ७१ इमारतीतील रहिवाश्यानी स्थलांतर केले असून उर्वरित ५४८ इमारतीत रहिवासी आज ही राहत आहेत.या इमारती इतक्या धोकादायक आहेत की हे रहिवासी जीव मुठीत घेवुन येथे रहातात असेच म्हणावे लागेल.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील अतिधोकादायक इमारतींची पाहणी करण्यात येते. पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या जर्जर इमारतींची यादी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जाहीर करण्यात येते. डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडईमधील इमारत कोसळल्यानंतर पालिकेने अतिधोकादायक, धोकादायक इमारतींची यादी तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पालिकेने यंदा अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून या ६१९ इमारती रिकाम्या करण्यासाठी इमारत मालक आणि रहिवास्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत ७१ इमारतींमधील रहिवाशांनी घर रिकामे करून स्थलांतर केले आहे. मात्र ५४८ इमारतींमध्ये धोका पत्करून रहिवासी तेथे राहत आहेत.