जलसंवर्धनासाठी केंद्र सरकार पूर्ण पाठिंबा देईल खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना नितीन गडकरी यांची ग्वाही
जलसंवर्धनासाठी केंद्र सरकार पूर्ण पाठिंबा देईल
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांना नितीन गडकरी यांची ग्वाही
ठाणे – केंद्र शासन एकीकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा पुरस्कार करते, पण प्रशासकीय यंत्रणा मात्र रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कुठलीही शासकीय योजना नसल्याचे सांगून ही यंत्रणा बसवण्याची कामे करण्यास नकार देतात, ही बाब कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी लोकसभेत निदर्शनास आणून देताच जलसंवर्धन ही काळाची गरज असून केंद्र सरकार जलसंवर्धनांच्या योजनांना पूर्ण समर्थन देईल, अशी ग्वाही केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच, यासंदर्भात सर्व राज्यांना नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, असेही ते म्हणाले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खा. डॉ. शिंदे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी केंद्र शासन धोरण आखणार का आणि केंद्रीय योजना राबवणार का, असा प्रश्न उपस्थित केला होता. देशातील भूजलपातळी झपाट्याने घटत चालली आहे. त्यामुळे भूजलाच्या प्रदूषणाचे प्रमाणही वाढत असून परिणामी लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडवणे आणि जिरवणे महत्त्वाचे आहे. मात्र, सरकारकडे केवळ बोअर वेल खोदण्याची योजना आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून या बोअर वेलचे पुनर्भरण करण्याची योजनाच नाही, ही बाब खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत मांडली.
त्यावर उत्तर देताना श्री. गडकरी म्हणाले की, पावसाचे पाणी अडवण्यासाठी कायदा करणे सोपे आहे, परंतु जनचळवळीच्या माध्यमातून हे काम झाले पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. यासंदर्भात राज्यांसाठी यापूर्वीच मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार, अनेक राज्यांमध्ये भूजलपातळी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, पुन्हा एकदा नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असे श्री. गडकरी म्हणाले.